|Friday, May 24, 2019
You are here: Home » उद्योग » इंजिन बनविण्यामध्ये ‘कमिन्स इंडिया’ भारतात आघाडीवर

इंजिन बनविण्यामध्ये ‘कमिन्स इंडिया’ भारतात आघाडीवर 

 औद्योगिक, वाहन, ऊर्जा, इंजिनीअरिंग, शेती तसेच इतर व्यवसायांना पुरवठा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कमिन्स इंडिया लिमिटेड ही अमेरिकेतील कमिन्स इंक या बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी असून, डिझेल आणि नैसर्गिक वायु इंजिन बनवणारी भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. कमिन्स केवळ इंजिनचे उत्पादक नव्हे तर त्यांचे विपणन, वितरण तसेच विक्री पश्चात सेवाही पुरविते. औद्योगिक, वाहन, ऊर्जा, इंजिनीअरिंग, शेती तसेच इतर व्यवसायांना इंजिन्स पुरवठा करणारी भारतातील कमिन्स समूहाची ही सर्वात मोठी कंपनी आहे.

इंजिन्सच्या समवेत कंपनी प्रत्येक उद्योगाला अनुसरून इतरही सेवा पुरविते. त्यात प्रामुख्याने जनरेटर सेट, ट्रान्सफर स्वीचेस, फिल्टरेशन, एकझॉस्ट, फ्युएल पंप इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये कंपनीचे आठ कारखाने आहेत. भारतीय बाजारपेठेत कंपनी कायम आघाडीवर राहिली असून कंपनीचा डिझेल इंजिनमध्ये 40 टक्के तर एचएचपी जने-सेट मध्ये 62 टक्के हिस्सा आहे.

अपेक्षेप्रमाणे कंपनीचे सप्टेंबर 2018 च्या तिमाहीत आर्थिक निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले आहेत. कंपनीने या कालावधीत 1451.55 कोटी रुपयांच्या उलाढालीवर 211.56 कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 29 टक्क्यांची वाढ झाली असून नक्त नफा 38 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या निर्यातीतही 21 टक्क्यांची वाढ होऊन ती 448 कोटीवर गेली आहे. कंपनीच्या उलाढालीत ऊर्जा क्षेत्रात 26 टक्क्यांचा वाटा असून औद्योगिक 16 टक्के तर वितरणाचा 26 टक्के वाटा आहे. सध्या रेल्वेचा वाटा केवळ 5 टक्के असला तरीही सरकारचा पायाभूत सुविधावरील भर, नवीन रेल्वे मार्ग आणि आधुनिकीकरण यामुळे कंपनीच्या उत्पादनांत वाढ झाली आहे.

Related posts: