|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ात दुसऱया दिवशीही अवकाळीचा दणका

जिल्हय़ात दुसऱया दिवशीही अवकाळीचा दणका 

प्रतिनिधी/ सांगली

दुष्काळी भागासह ऊसपट्टय़ात सलग दुसऱया दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावून झोडपून काढले. दुष्काळीपट्टय़ातील रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी, द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांची मात्र चांगलीच झोप उडविली आहे. या पावसामुळे फुलोऱयात असलेल्या द्राक्षपिकाला मोठा फटका बसला आहे. शिवाय ऊसपट्टय़ातील तोडी दुसऱयादिवशीही बंद होत्या. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे जिल्हय़ातील दाक्ष आणि डाळिंब पिकाचे सुमारे 00000 रूपयाचे नुकसान झाले आहे. 

हवामानातील बदलत्या वातावरणामुळे गेल्या चार दिवसापासून जिल्हय़ात सर्वत्रच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पण, गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. निम्म्याहून अधिक जिल्हा दुष्काळाशी सामना करीत असताना अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी जिल्हय़ातील जत, तासगाव आणि मिरज तालुका वगळता जिल्हय़ात इतत्र अवकाळी पावसाने झोडपून काढले हेते. पण, मंगळवारी सकाळपासून जिल्हय़ातील सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱया दिवशी हजेरी लावून अनेक भागाला झोडपून काढले. तर काहीभागात रिपरिप सुरू होती.

मंगळवारी दुपारनंतर सांगली, मिरज शहरासह मिरज तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे सांगली शहरातील शिवाजी मंडईला तळय़ाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर शहरातील गटारी तुडुंब वाहत होत्या. शहरातील गुंठेवारी भागात तर दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शिवाय अनेक रस्त्यावर चिखल झाल्याने दुचाकी आणि पायी चालत जाणाऱयांना तारेवरची कसरत करीतच जावे लागत होते. मिरज आणि कुपवाड शहरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

मिरज तालुक्यातील मालगाव, सलगरे, भोसे, सोनी, आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, खंडेराजुरी या द्राक्षपट्टय़ातही पावसाने हजेरी लावली. या भागात सुमारे अर्ध्यातासाहून  अधिककाळ पावसाची रिपरिप सुरू होती. या भागातील दाक्षपीक सद्या फुलोऱयात आणि मणीसेट अवस्थेत आहेत. त्यामुळे फुलोऱयातील बागांना दावण्यासारख्या रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रार्दुभाव झाला आहे. तर, मणीसेट अवस्थेतील बागा घडकुजव्या रोगाला बळी पडत असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळीपट्टय़ातील जत तालुक्यातीलही अनेक गावाना अवकाळी पावसाने झोडपून काढले. डफळापूर, उमदी, कुंभारी आदी गावात दमदार पाऊस झाला आहे.  तालुक्यात द्राक्षपिकाचे क्षेत्र कमी असले तरी रब्बी आणि डाळींबाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. रब्बी हंगामातील शाळू, हरभरा पिकांना जीवदान मिळाले असले तरी डाळिंब पिकावर मात्र निर्माण झालेल्या वातावरणामुळे तेल्या रोगाचा प्रार्दुभाव होण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.

वाळवा तालुक्याला सलग दुसऱया दिवशीही दमदार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील इस्लामपूर, बोरगाव, बागणी, आष्टा आदी गावाना दमदार पावसाने झोडपून काढले. या तालुक्याच्या वारणा आणि कृष्णाकाठावर भात कापणी सुरू असून ऊसतोडही मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून पावसामुळे काहीभागातील ऊसतोडय़ा बंद पडल्या आहेत. पलुस तालुक्यातही सलग दुसऱया दिवशी हजेरी लावली होती. कुंडल, भिलवडी, पलूस भागात सकाळी सुमारे तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर मात्र दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होते. आटपाडी, खानापूर या दुष्काळी भागात आजही अवकाळी पावसाने हजेरी लावून निर्यातक्षम द्राक्षबागायतदार आणि डाळिंब बागायतदारांची झोप उडवून दिली. विटा शहरासह तालुक्याच्या पुर्वभागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर आटपाडी तालुक्यातील दिघंचीसह अनेक गावात सकाळी तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. कडेगाव तालुक्यातही कडेगाव आणि सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरातही सकाळच्या सत्रात अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला आज सलग दुसऱया दिवशीही अवकाळीने झोडपून काढले. सकाळी सुमारे तासभर दमदार पाऊस सुरू होता.