|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 25 लाखाच्या आमिषाने 20 हजार गमावले

25 लाखाच्या आमिषाने 20 हजार गमावले 

केबीसीच्या नावाने फसवणूकीचा प्रकार

प्रतिनिधी / बेळगाव

‘कौन बनेगा करोडपती’ स्पर्धेमध्ये तुम्हाला 25 लाख रुपयांचे बक्षिस लागले आहे. त्याकरिता तुम्हाला आधी वीस हजार रुपये भरावे लागतील, अशी सूचना देणाऱया फोन कॉलद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. मात्र याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झालेली नाही. अशी फसवणूक प्रकारांपासून नागरिकांनी सावध होण्याची गरज होत आहे. 25 लाखाच्या अमिषापोटी 20 हजार गमविण्याची वेळ त्या नागरिकावर आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, शहरातील एका नागरिकाला नवी दिल्ली येथून एक फोन आला. या फोनवरून आपण ‘कौन बनेगा करोडपती’ स्पर्धेच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगण्यात आले. तसेच तुम्हाला या स्पर्धेमधून 25 लाखांचे बक्षिस लागले आहे. सदर बक्षिसाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा करावयाची असेल तर आधी वीस हजार रुपये त्वरित जमा करा, अशी सूचना करण्यात आली. आपल्याला वीस हजार रुपये भरल्यानंतर 25 लाखा इतकी मोठी रक्कम मिळण्याच्या मोहातून त्या व्यक्तीने सदर रक्कम एका राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून जमाही केली.

मात्र त्यानंतर ज्या फोनवरून कॉल आला होता तो क्रमांक पुन्हा लागला नाही. वारंवार प्रयत्न करूनही त्या क्रमांकाशी संपर्क झाला नाही. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार असल्याची बाबत सामोरी आली, अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.