|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्गावर तिहेरी अपघातात 9 जखमी

महामार्गावर तिहेरी अपघातात 9 जखमी 

वार्ताहर/ पाली

मुंबई-गोवा महामार्गावर खानूनजीक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी तवेरा कार आणि समोरुन येणाऱया बोलेरो पिकअप् व ओव्हरटेक करणाऱया मॅक्झिमो टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात नऊजण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 6.30च्या सुमारास झालेल्या या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. यातील जखमी मुळचे कणकवलीचे सध्या मुंबई येथे राहणारे आहेत.

या अपघातासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, तवेरा कारमधील लहू श्रीधर माने (42 रा. मालाड), विनायक मंगेश परब (36), प्रभाकर सोमा पाताडे (60), हेमंत परब (40), विजय चंद्रकांत गायकवाड (31), तवेरा चालक पांडुरंग नारायण गवस (40, सर्व रा. भांडुप, मुंबई) व बोलेरो पिकअपचे चालक जितेंद्र जयराम सकपाळ (33), नबिसाब हुसेनी चिक्काळी (40), मैनुद्दिन सैफन चिक्काळी (28, सर्व रा. लांजा) हे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. यातील

शनिवारी सकाळी 6.30 वा.च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील खानू गावच्या हद्दीत हा अपघात झाला. तवेरा चालक पांडुरंग नारायण गवस (रा. भांडुप) हे मुंबई ते कणकवली असा प्रवास करत होते. यावेळी गोव्याकडून  मुंबईकडे जाणाऱया बोलेरो पिकअप्ची तवेराशी समोरासमोर धडक झाली. ही गाडी जितेंद्र जयराम सकपाळ (रा. लांजा) चालवत होते. याचवेळी मागून येणाऱया मॅक्झिमो टेम्पोची धडक या दोन्ही वाहनांना बसली. यामध्ये तवेरा व बोलेरो पिकअप्मधील प्रवासी जखमी झाले.

जखमीना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील  चालक पांडुरंग नारायण गवस, विनायक मंगेश परब, प्रभाकर सोमा पाताडे, हेमंत परब या चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

 या अपघाताचा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झगडे, पोलीस नाईक मोहन पाटील हे करत आहेत. या अपघाताची खबर गणपत बाबू झोरे यांनी दिली.