|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याने आत्महत्या

वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याने आत्महत्या 

प्रतिनिधी / वैभववाडी:

वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडीमधलीवाडी येथील ओंकार सदानंद कदम (13) या शाळकरी मुलाने राहत्या घराच्या खोलीतील छपराच्या वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याच्या रागातून ओंकार याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर येत आहे.

ओंकार हा कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. त्याच्या वडिलांचा रिक्षा व्यवसाय आहे. आपल्या मुलाने खूप शिकून मोठं व्हावं, यासाठी अभ्यास करण्यास त्याचे वडील त्याला सांगायचे. मात्र, त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असे. मंगळवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी ओंकारने नेहमीप्रमाणे तयारी केली. सकाळी उठल्यानंतर त्याने आपल्या आईला दुपारसाठी भाजी करण्यास सांगितली होती. त्यानंतर काही वेळातच घरात कोणीही नसल्याचे पाहून त्याने खोली बंद करीत छपराच्या वाशाला दोरीने गळफास लावून घेतला. घटनेची खबर सुभाष रामचंद्र रावराणे यांनी वैभववाडी पोलिसांत दिली.

ओंकारचा स्वभाव मनमिळावू होता. त्यामुळे खेळताना त्याच्याभोवती लहान मुलांचा गराडा असे. क्षुल्लक कारणामुळे त्याने आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.