|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ट्रम्प यांना हवी पाकची मदत

ट्रम्प यांना हवी पाकची मदत 

पाक मंत्र्याने केला दावा : अफगाण मुद्यावर पाठविले पत्र

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद 

दहशतवादाबद्दल दुटप्पीपणा दाखविणाऱया पाकिस्तानावर अमेरिका अत्यंत नाराज आहे. अलिकडेच पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत रोखण्यात आली होती. परंतु आता पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांने केलेला दावा काहीसा धक्कादायक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्र लिहून पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे सहकार्याची मागणी केल्याचा दावा मंत्र्याने केला आहे.

अफगाण सुरक्षा दल आणि अफगाण-तालिबानी दहशतवादी यांच्यात 17 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्याची ट्रम्प यांची इच्छा असल्याचे फवाद यांनी म्हटले आहे. तालिबान देशातून आंतरराष्ट्रीय सैन्य बाहेर घालविणे आणि स्वतःच्या मर्जीनुसार कठोर इस्लामी कायदा लागू करण्यासाठी लढा देत आहे. तालिबानी नेतृत्वाला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी पाकिस्तानने स्वतःच्या प्रभावाचा वापर करावा असे अमेरिकेचे मत आहे. पाकिस्तानच तालिबानचा पाठिराखा असल्याचे अमेरिकेचे मानणे आहे.

पाकिस्तानसोबतचे संबंध अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचबरोबर अफगाण संघर्षाचा तोडगा काढण्यास पाकिस्तानची मोठी भूमिका राहणार असल्याचे ट्रम्प यांनी पत्रात नमूद केल्याचा दावा मंत्री फवाद यांनी केला आहे. परंतु इस्लामाबादमधील अमेरिकेच्या दूतावासाने या पत्राबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

अब्जावधी डॉलर्सची मदत मिळून देखील पाकिस्तानने अमेरिकेसाठी काहीच केलेले नाही. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन अबोटाबादमध्ये लपल्याचे पाकिस्तानी अधिकाऱयांना माहिती होते असा आरोप ट्रम्प यांनी मागील महिन्यात केला होता. 2011 मध्ये एका मोहिमेत अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला होता.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी तालिबानसोबत शांतता करारासाठी पथक स्थापन केल्याचे सांगितले आहे. कोणताही करार लागू करण्यासाठी किमान 5 वर्षांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.