|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तेलंगणात लक्ष्मण यांच्याकडूनच अपेक्षा

तेलंगणात लक्ष्मण यांच्याकडूनच अपेक्षा 

डॉक्टर के. लक्ष्मण आंध्रप्रदेश भाजपचे महत्त्वाचे चेहरे आहेत. लक्ष्मण हे विद्यार्थीदशेपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न राहिले आहेत. भाजपच्या स्थापनेपासूनच राज्यात पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 2016 मध्ये प्रदेशाध्यक्ष झालेल्या लक्ष्मण यांच्याकडून भाजपला यंदा मोठी अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत टीआरएसला 63, काँग्रेसला 21, तेदेपला 15, एमआयएमला 7, भाजपला 5 आणि वायएसआर काँग्रेसला 3 तर इतरांना 5 जागांवर विजय मिळाला होता.

पक्षासाठी नोकरी नाकारली

लक्ष्मण यांचे शिक्षण हैदराबाद येथे झाले असून एमएससी केल्यानंतर त्यांनी भूगर्भशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव मिळाला होता, परंतु राजकारणाकडील ओढय़ामुळे त्यांनी नोकरी नाकारली होती. 1980 च्या काळात लक्ष्मण यांनी उस्मानिया विद्यापीठ हैदराबादमध्ये अभाविपमधून विद्यार्थी राजकारणास प्रारंभ केला आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही.

1994 मध्ये लक्ष्मण यांनी पहिली निवडणूक हैदराबाद शहराच्या मुंशीराबाद विधानसभा मतदारसंघातून लढविली, परंतु त्यांना किरकोळ मतांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यांनी 1999 मध्ये याच मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली, 2014 मध्ये देखील लक्ष्मण यांनी मुंशीराबाद मतदारसंघातून विजयी होत विधानसभेत प्रवेश केला होता.

भाजप स्वबळावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी 2016 मध्ये लक्ष्मण यांना तेलंगणा भाजप अध्यक्षपदी नियुक्त केले. तेव्हापासून ते केसीआर सरकारच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहे. सत्तारुढ टीआरएस तसेच काँग्रेस-टीडीपी समवेत अनेक पक्षांच्या आघाडीसोबत लढत द्यावी लागत आहे.