|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आर्थिक वादातून व्यापाऱयाचा निर्घृण खून

आर्थिक वादातून व्यापाऱयाचा निर्घृण खून 

प्रतिनिधी /सांगली :

 उसनवार घेतलेले पैसे परत देण्याच्या वादातून भाडेकरू असलेल्या रिक्षाचालकाने पेंड व्यापाऱयाचा खून केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथील गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग येथे घडली. प्रशांत सूर्यकांत पाटील (वय 40, रा. विश्रामबाग, मूळ गाव डोर्ली ता. तासगाव)  असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी सर्फराज ताजुद्दीन निपाणी (वय 32) याला दोन तासातच पोलिसांनी अटक केली आहे.

  मृत प्रशांतची पत्नी राजलक्ष्मी पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून निपाणीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनानंतर पसार झालेल्या निपाणीला अवघ्या दोन तासात जेरबंद केले. याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत प्रशांत पाटील यांच्या साई सदन अपार्टमेंट, विश्रामबाग येथील फ्लॅटमध्ये  संशयित आरोपी सर्फराज निपाणी हा भाडय़ाने राहत होता. जत शहरातील छत्रीवाला रोड येथे त्याचे मूळ घर आहे. रिक्षा व्यवसायाच्या निमित्ताने तो काही वर्षापूर्वी सांगलीत आला आहे. त्याच्या तेरा ते चौदा रिक्षा होत्या. सांगली-मिरज रस्त्यावर प्रवासी वाहतुकीबरोबरच तो दररोज चालकांना भाडय़ानेही रिक्षा देत होता. पण, अलिकडच्या काळात कर्जबाजारी झाल्याने त्याने बहुतांशी रिक्षा विकल्या आहेत.

 तर प्रशांत पाटील हे मूळचे तासगाव तालुक्यातील डोर्ली येथील होते. व्यवसायासाठी सांगलीत आल्यानंतर मार्केट यार्डमध्ये लक्ष्मीकांत ट्रेडींग कंपनी हे त्यांचे गोळी पेंड तसेच अडतीचे दुकान आहे. तसेच विश्रामबाग गणपती मंदिर येथे रेडीमेड कपडय़ाचे दुकानही आहे.

 एक वर्षापूर्वी प्रशांतकडून भाडेकरू निपाणी याने दोन लाख रूपये उसनवार  घेतले होते. पण, कर्जबाजारीपणामुळे परत केले नव्हते. प्रशांत पाटीलने तगादा लावला तरीही तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यावरून त्यांच्यात अनेक वेळा वादही झाले होते. गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निपाणीने प्रशांत पाटील यांना घरी बोलावले. प्रशांत पाटील आणि त्यांची पत्नी राजलक्ष्मी निपाणीकडे गेले. पुन्हा पती पत्नीने निपाणीकडे आपले पैसे परत देण्याची मागणी सुरू केली.