|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कामत गल्ली, कसई गल्ली येथे वाहने पेटविली

कामत गल्ली, कसई गल्ली येथे वाहने पेटविली 

प्रतिनिधी /बेळगाव :

बेळगाव शहर व उपनगरांमध्ये समाजकंटकांचा उपद्रव सुरूच आहे. शेरी गल्ली कॉर्नर व मुजावर गल्ली-शिवाजीरोड परिसरात दोन कार, एक ऑटोरिक्षावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्रीनंतर कामत गल्ली व कसई गल्ली परिसरात घरासमोर उभी करण्यात आलेली दोन वाहने पेटविण्यात आली. या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजण्याच्या सुमारास या घटना उघडकीस आल्या असून मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुरुवारी रात्री यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कामत गल्ली येथील अक्षय किल्लेकर यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली केए 22 बी 9147 क्रमांकाची ऑटोरिक्षा पेटविण्यात आली आहे. या घटनेत सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कसई गल्लीत मोशिन शरिफ बेपारी यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली केए 22 ईएच 9605 क्रमांकाची फॅशनप्रो मोटरसायकल पेटविण्यात आली आहे. या घटनेत सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी 10 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होत आहे. पोलीस यंत्रणा अधिवेशन बंदोबस्तात गुंतली आहे. हीच संधी साधून समाजकंटकांनी उपद्रव सुरू केला आहे. शेरी गल्ली कॉर्नर, मुजावर गल्ली-शिवाजीरोड परिसरातील दोन कार व एक ऑटोरिक्षावर दगडफेक केल्याच्या आरोपावरून खडेबाजार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आता कामत गल्ली व कसई गल्ली परिसरात वाहने पेटविणाऱया समाजकंटकांचा शोध घेण्यात येत आहे.