|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वीज जोडणीपासून 14 हजार शेतकरी वंचित

वीज जोडणीपासून 14 हजार शेतकरी वंचित 

प्रतिनिधी/ सांगली

विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढण्याच्या नावाखाली जिल्हय़ातील 14 हजाराहून अधिक शेतकरी गेल्या चार वर्षापासून वीज जोडणीपासून वंचित आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी दुष्काळी पट्टय़ातील आहेत.

जिल्हय़ाच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱया टेंभू, म्हैसाळ, ताकारी या सिंचन योजनांचे सध्या अवर्तन सुरू आहे. शिवाय, प्रत्येक हंगामात आवर्तन सुरू होत असल्याने या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकरीही पारंपरिक शेती सोडून बागायत आणि आधुनिक शेतीकडे वळला आहे. आज डाळिंब आणि द्राक्ष शेती जिल्हय़ाच्या या दुष्काळी पट्टय़ातच मोठय़ा प्रमाणात पिकविली जाते. पण, वीज जोडणीसाठी अर्ज करूनही शेतकऱयांना वीज कनेक्शन दिले जात नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही हे शेतकरी आपले क्षेत्र बागायती करू शकत नाहीत. त्यामुळे या शेतकऱयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

जिल्हय़ात आज अखेर 14 हजार 300 वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये तीन एचपी पासून ते 10 एचपी पर्यंतच्या जोडण्यांचा समावेश आहे. जिल्हय़ात सर्वाधिक दुष्काळी पट्टय़ातच वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये जत तालुक्यातील सर्वांधिक दोन हजार 916 वीज जोडण्या प्रलंबित आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक हजार 212, खानापूर तालुक्यातील एक हजार 560, कडेगाव तालुक्यातील एक हजार 110 आणि आटपाडी तालुक्यातील एक हजार 94 जोडण्याचा समावेश आहे. तर मिरज, पलूस, शिराळा, वाळवा, तासगाव या तालुक्यातील वीज जोडण्या या 500 पेक्षा कमी आहेत.

या वीज जोडण्या पूर्ण झाल्यातर उपलब्ध असलेल्या वीजवितरण प्रणालीवर परिणाम होणार असल्याने 10, 16, 25 आणि 63 केव्हीए क्षमतेची विद्युत रोहित यंत्रे उभारण्यात येणार असून यासाठी 15 उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात प्रत्येकी तीन, वाळवा, मिरज, तासगाव, खानापूर आणि पलुस तालुक्यात प्रत्येकी एक आणि आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून ती उभारण्याची काही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.

दुष्काळी पट्टय़ावर असलेल्या पावसाच्या अवकृपेमुळे जिल्हय़ातील आटपाडी, तागासव, मिरज तालुक्याचा पूर्वभाग, जत, कवठेमहांकाळ या भागातील शेतकऱयांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. पण, जिल्हय़ाचे वैशिष्ठय़ म्हणजे या भागात शेतीचे नवनवीन उपक्रम राबविले जातात. आटपाडी आणि जतच्या डाळिंब पिकाने सातासमुद्रापारच्या बाजारपेठेत धडक मारली आहे. तर खानापूर, मिरज आणि तासगाव तालुक्यातील द्राक्षांनी यापूर्वीच सातासमुद्रापारची बाजार पेठ काबीज केली आहे. पण, याच दुष्काळी पट्टय़ातील शेतकऱयांच्याच मोठय़ा  शेतीच्या पाण्यासाठी आवश्यक लागणाऱया वीज जोडण्या मोठय़ा प्रमाणात पप्रलंबीत ठेवण्यात आल्या आहेत.

मराठवाडा आणि विदर्भातील अनुशेष भरून काढण्याच्या नावाखाली पश्चिम महाराष्ट्रातील नव्याने जोडण्यात येणाऱया वीज जोडण्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आल्या असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून सांगण्यात आली.