|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » महाराष्ट्राची सामन्यावर पकड

महाराष्ट्राची सामन्यावर पकड 

मुंबईविरुद्ध रणजी लढत : दुसऱया डावात महाराष्ट्राच्या 5 बाद 112 धावा,

वृत्तसंस्था/ पुणे

येथे सुरु असलेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईविरुद्ध लढतीत महाराष्ट्राने 191 धावांची आघाडी मिळवली आहे. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राने 52 षटकांत 5 बाद 112 धावा जमवल्या होत्या. दिवसअखेरीस कर्णधार राहुल त्रिपाठी 13 व स्वप्नील बच्छाव 3 धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, मुंबईचा पहिला डाव 273 धावांवर आटोपल्याने महाराष्ट्राला 79 धावांची आघाडी मिळाली होती.

मुंबईने 5 बाद 196 धावसंख्येवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. मात्र, अवघ्या 77 धावांची भर घातल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 80.5 षटकांत 273 धावांत आटोपला. मुंबईकडून कर्णधार सिद्धेश लाडने सर्वाधिक 93 धावा फटकावल्या. शुभम रांजणेने नाबाद 54 धावा करत त्याला चांगली साथ दिली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरल्याने मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही. महाराष्ट्राकडून पालकरने 4 तर फल्लाहने 3 गडी बाद केले.

79 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱया डावात खेळताना मात्र महाराष्ट्राची घसरगुंडी उडाली. स्वप्नील गुगळे व चिराग खुराना यांनी दमदार सुरुवात करताना 58 धावांची सलामी दिली. पण, गुगळेला 37 धावांवर मल्होत्राने बाद करत महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. यानंतर खुरानाही 38 धावा काढून बाद झाला. ही जोडी बाद झाल्यानंतर जय पांडे (9), नौशाद शेख (4), रोहित मोटवानी (1) हे स्टार फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार त्रिपाठी (नाबाद 13) व बच्छाव (नाबाद 3) यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड न होऊ दिली नाही. तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 52 षटकांत 5 बाद 112 धावा केल्या असून त्यांच्याकडे 191 धावांची आघाडी आहे. मुंबईतर्फे शिवम दुबेने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र प.डाव 352 व दु.डाव 52 षटकांत 5 बाद 112 (गुगळे 37, चिराग खुराना 38, त्रिपाठी खेळत आहे 13, बच्छाव खेळत आहे 3, शिवम दुबे 2/7, मल्होत्रा 1/26, पारकर 1/21). मुंबई प.डाव 273

अखेरच्या सामन्यात गंभीरचे शानदार शतक, दिल्ली 7/409

नवी दिल्ली : गौतम गंभीरच्या शानदार शतक व ध्रुव शोरे आणि हितेन दलाल यांनी अर्धशतके झळकावत त्याला दिलेली साथ या जोरावर दिल्लीने रणजी चषक स्पर्धेत आंध्र प्रदेशविरुद्ध लढतीत 144 षटकांत 7 बाद 409 केल्या आहेत. कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या गंभीरने 10 चौकारासह 112 धावांची खेळी साकारली. ध्रुव शोरेने 98 तर हितेन दलालने 58 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडे आता 19 धावांची निसटती आघाडी आहे. तत्पूर्वी, आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 390 धावा केल्या होत्या.