|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताला विजयी सुरुवात करण्याची संधी

भारताला विजयी सुरुवात करण्याची संधी 

पहिली कसोटी, चौथा दिवस : कांगारूंना 219 धावांची, भारताला 6 बळींची गरज

वृत्तसंस्था/ ऍडलेड

भारत व ऑस्टेलिया यांच्यातील पहिली कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली असून या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्टेलियन फलंदाजी पुन्हा एकदा उघडी पाडली. दिवसअखेर दुसऱया डावात ऑस्टेलियाने 4 बाद 104 धावा जमविल्या असून त्यांना विजयासाठी अद्याप 219 धावांची गरज आहे तर मालिकेची विजयी सुरुवात करण्यासाठी भारताला आणखी 6 बळींची गरज आहे.

भारताने पहिल्या डावात 250 धावा जमविल्यानंतर भारताच्या भेदक माऱयासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला आणि भारताला 15 धावांची किरकोळ आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसऱया डावात 307 धावा जमवित यजमानांसमोर 323 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱया डावात त्यांचे चार गडी बाद झाले असून भारतीय माऱयासमोर अतिबचावात्मक धोरण अवलंबणाऱया ऑस्ट्रेलियन फलंदाजांना शेवटच्या दिवशी आणखी 219 धावा जमविण्याचे कठीण आव्हान पेलावे लागणार आहे. एकंदर स्थिती पाहता भारताचे पारडे जड असून विजयाची अधिक संधी पाहुण्या संघाला आहे.

शेवटच्या सत्रात प्रभावी मारा करणाऱया अश्विनने 19 षटकांत 44 धावांत 2 तर मोहम्मद शमीने केवळ 9 षटके गोलंदाजी करीत 15 धावांत 2 बळी मिळविले आहेत. या सत्रात ऑस्टेलियाने मार्कुस हॅरिस (26), उस्मान ख्वाजा (8), पीटर हँडस्कॉम्ब (14) यांच्या रूपात तीन गडी गमविले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शॉन मार्श 31 (92 चेंडू) व पहिल्या डावातील अर्धशतकवीर ट्रव्हिस हेड 11 (37 चेंडू) धावांवर खेळत होते. चहापानानंतर ऑस्टेलियाला 13 व्या षटकांत जीवदान मिळाले. शमीच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये पुजाराला हॅरिसचा कठीण झेल टिपता आला नाही. यावेळी हॅरिस 14 धावांवर होता. पण शमीने नंतर 17 व्या षटकांत हॅरिसला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करीत बळी मिळविला. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या आशेला सर्वात मोठा धक्का देताना अतिसावध फलंदाजी करणाऱया उस्मान ख्वाजाला डीप मिडॉफ क्षेत्रात झेलबाद केले. ख्वाजाने 42 चेंडूत 8 धावा काढल्या. रोहित शर्माने पुढे धावत येत पुढे झेपावून हा झेल टिपला.

हँडस्कॉम्ब व मार्श यांनी चौथ्या गडय़ासाठी 24 धावांची भर घातली. हँडस्कॉम्बला 34 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर केएल राहुलकडून जीवदान मिळाले होते. पण तीन षटकांनंतर शमीला उंचावरून फटका मारताना मिडविकेटवर पुजाराने त्याचा झेल टिपून त्याला माघारी धाडले. त्याआधी मारताचा डाव संपल्यानंतर चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने 12 षटकांत 1 बाद 28 धावा जमविल्या होत्या. ऍरोन फिंचला अश्विनने 11 धावांवर बाद केले. शून्यावर असताना दुसऱयाच चेंडूवर पायचीतच्या अपिलातून तो बचावला होता. डीआरएसमध्ये इशांतचा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाल्याने तो बचावला होता. पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. यावेळी त्याने डीआरएस न घेण्याची चूक केल्याचे नंतर स्पष्ट झाले. कारण चेंडूने त्याच्या ग्लोव्ह्जला स्पर्श केल्याचे दिसून आले नाही.

उपाहारानंतर डाव गडगडला

तत्पूर्वी, 3 बाद 151 या धावसंख्येवरून भारताने दुसऱया डावास पुढे सुरुवात केली आणि रहाणे व पुजारा यांनी अर्धशतके झळकवल्यानंतरही उपाहारानंतर शेवटच्या पाच फलंदाजांना केवळ 47 धावांचीच भर घालता आली. रिषभ पंतने लियॉनवर आक्रमण करण्याचे धोरण कायम ठेवले. पण तो फार काळ टिकला नाही. लियॉनला उत्तुंग फटका मारताना डीप कव्हरमध्ये त्याचा झेल टिपला गेला. त्याने 16 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 28 धावा फटकावल्या. तो बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोलमडला. आश्विन (5) व रहाणे (70) यांनी अपारंपरिक फटके मारत बाद झाले. त्यावरून डावाची घोषणा करण्याची तयारी सुरू असल्याचे वाटले. पण ती वेळच आली नाही. अश्विन स्टार्कला पुल करताना झेलबाद झाला तर रहाणे रिव्हर्स स्वीप मारताना झेलबाद झाला. शमी पहिल्याच चेंडूवर लियॉनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इशांतला स्टार्कने शून्यावर बाद करून भारताचा डाव 307 धावांवर संपुष्टात आणला. उपाहारानंतर केवळ 11.5 षटकांत भारताचे 7 फलंदाज 73 धावांची भर घालून बाद झाले. लियॉनने या डावात 122 धावांत 6 तर स्टार्कने 40 धावांत 3 गडी बाद केले.

पुजारा-रहाणेची अर्धशतके

दिवसाच्या पहिल्या सत्रात पुजारा व रहाणे यांनी चांगली सुरुवात केली होती. दोघांनी चौथ्या गडय़ासाठी 87 धावांची भागीदारी केली. लियॉनने रफ पॅचचा चांगला वापर करीत फलंदाजांना अडचणीत आणले होते. 77 क्या षटकात भारताचे द्विशतक फलकावर लागले तर या दोघांची अर्धशतकी भागीदारी 103 चेंडूत पूर्ण झाली. पुजाराने 140 चेंडूत 20 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. नंतर रहाणेनेही 16 वे अर्धशतक 111 चेंडूत पूर्ण केले. रोहित शर्मा (1) पुन्हा अपयशी ठरला. पुजाराला लियॉनच्या गोलंदाजीवर शॉर्टलेगमध्ये झेलबाद झाला. त्याने या सामन्यात एकूण 450 चेंडूंचा सामना करीत ऑस्टेलियन भूमीत सर्वाधिक चेंडू खेळणारा भारताचा तो दुसरा फलंदाज बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने 2004 मध्ये सिडनी कसोटीत 525 चेंडू खेळले होते.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 250, ऑस्टेलिया प.डाव 235, भारत दु.डाव : राहुल 44 (67 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), विजय 18 (53 चेंडू), पुजारा 71 (204 चेंडूत 9 चौकार), कोहली 34 (104 चेंडूत 3 चौकार), रहाणे 70 (147 चेंडूत 7 चौकार), रोहित शर्मा 1 (6 चेंडू), पंत 28 (16 चेंडूत 4 चौकार 1 षटकार), अश्विन 5 (18 चेंडू), इशांत 0 (15 चेंडू), शमी 0 (1 चेंडू), बुमराह नाबाद 0 (10 चेंडू), अवांतर 36, एकूण 106.5 षटकांत सर्व बाद 307. स्टार्क 3-40, लियॉन 6-122.

ऑस्ठ्रेलिया दु.डाव : फिंच 11 (35 चेंडूत 1 चौकार), हॅरिस 26 (49 चेंडूत 3 चौकार), उस्मान ख्वाजा 8 (42 चेंडू), शॉन मार्श खेळत आहे 31 (92 चेंडूत 3 चौकार), हँडस्कॉम्ब 14 (40 चेंडूत 1 चौकार), हेड खेळत आहे 11 (37 चेंडूत 1 चौकार), अवांतर 3, एकूण 49 षटकांत 4 बाद 104. अश्विन 2-44, शमी 2-15.