|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिवाळी अधिवेशन आजपासून, असंतुष्टांची भूमिका काय?

हिवाळी अधिवेशन आजपासून, असंतुष्टांची भूमिका काय? 

बेळगावला पोलीस छावणीचे स्वरुप, पहिल्याच दिवशी आंदोलक होणार आक्रमक

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी 10 डिसेंबरपासून हलगा येथील सुवर्णविधानसौधमध्ये प्रारंभ होणार आहे. सोमवारी दुपारी 12.15 वाजता विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होणार आहे. श्रद्धांजलीनंतर प्रश्नोत्तर व लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी, माजी मुख्यमंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांचा परदेश दौरा, शेतकरी व ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक झालेले विरोधक आदी कारणांमुळे हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार आहे.

मंत्रीपदासाठी इच्छुक व मंत्रीमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबामुळे काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरविण्याचा विचार चालविला आहे. सिद्धरामय्या समर्थक आमदार जर गैरहजर राहिले तर युती सरकारच्या अडचणी वाढणार असून हिवाळी अधिवेशनात सरकारला घाम सुटणार आहे. शेतकऱयांच्या प्रश्नावर भाजप रयत मोर्चाच्यावतीने सोमवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा रविवारी बेळगाव येथे दाखल झाले आहेत.

केएलई संस्थेच्या वसतिगृहात येडियुराप्पा यांचे वास्तव्य आहे. याच वसतिगृहात रविवारी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व सभागृहाबाहेर युती सरकारची कोंडी करण्यासाठी या बैठकीत व्यूहरचना करण्यात आली. काही नेते अनुपस्थित असल्यामुळे सोमवारी सकाळी भाजप नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे.

काँग्रेसमध्ये नाराजी

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी आपले चिरंजीव आमदार डॉ. यतिंद्र यांच्यासह परदेश दौऱयावर निघाले आहेत. एकीकडे सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप आक्रमक झाले असतानाच सिद्धरामय्या हे परदेश दौऱयावर निघाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

सिद्धरामय्या सरकारच्या कारकीर्दीत 35 हजार कोटी रुपयांच्या शासकीय निधीचा खर्च कसा झाला, याचा हिशेब लागत नाही. या मुद्दय़ावर काँग्रेसबराब्sारच युती सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना केली असतानाच सभागृहात समर्थपणे विरोधकांना तोंड देण्याऐवजी सिद्धरामय्या परदेश दौऱयावर निघाले आहेत. खुद्द मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱयांनीही आंदोलन छेडले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या दोन्ही आंदोलनाच्या झळा पोहोचणार आहेत. शेतकऱयांच्या कर्जमाफीतील सावळा गोंधळ, दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, ऊस उत्पादक शेतकऱयांच्या समस्या, उत्तर कर्नाटकावर अन्याय आदी मुद्दे उपस्थित करुन सरकारच्या अडचणी वाढविण्याचे भाजपने ठरविले आहे.

उपराजधानीचा तिढा

आक्रमक झालेल्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्याचा गांभीर्याने विचार केला आहे. मात्र या विचाराला त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा विरोध होत आहे. उपराजधानीची घोषणा करण्याऐवजी सुवर्णविधानसौधमध्ये काही प्रमुख कार्यालये हलविण्याचा सल्ला काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर तिढा निर्माण झाला आहे.

दरम्यान विरोधीपक्ष नेते येडियुराप्पा, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक यांच्यासह भाजपचे अनेक नेते रविवारी बेळगावात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे सोमवारी सकाळी बेळगावला येणार आहेत. शेतकऱयांच्या कर्जमाफीमुळे काटकसर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असून त्यानुसार काही खर्चांवर निर्बंध आले आहेत.

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच काँग्रेस संसदीय पक्ष बैठक होणार होती. मात्र संसदीय पक्षाचे नेते सिद्धरामय्या सोमवारी परदेश दौऱयावर निघाल्याने ही बैठक आता 18 डिसेंबर रोजी होणार आहे. समन्वय समितीच्या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी मंत्रीमंडळ विस्तारासाठी 22 डिसेंबरचा मुहूर्त ठरविला असून किमान यावेळी तरी ठरल्याप्रमाणे विस्तार करा, यासाठी इच्छुक नेते दबाव आणत आहेत.

बंडखोर गैरहजर राहणार?

काँग्रेसमधील सुमारे 15 हून अधिक बंडखोर नेते गैरहजर राहण्याची शक्मयता आहे. त्यामुळे काँग्रेस, निजद नेत्यांमध्ये अस्वस्थतता पसरली आहे. अधिवेशन काळात असंतुष्ट आमदार कोणती भूमिका घेणार? युती सरकारच्या अडचणी वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत असून असंतुष्टांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

येडीयुराप्पा खासगी वसतिगृहात

विरोधीपक्षनेते बी. एस. येडियुराप्पा यांच्या इच्छेप्रमाणे निवासाची व्यवस्था सरकारने केली नाही म्हणून त्यांनी केएलई संस्थेच्या वसतिगृहात आपले वास्तव्य केले आहे. या मुद्दय़ावर येडियुराप्पा सरकारवर गरम झाले आहेत.

शहराला पोलीस छावणीचे स्वरुप

विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी यांच्या नेतृत्वाखाली सात पोलीस प्रमुख, 11 अतिरिक्त पोलीस प्रमुख, 34 पोलीस उपअधीक्षक, 81 पोलीस निरीक्षक, 227 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 4 हजार 874 पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य राखीव दलाच्या 30, सशस्त्र दलाच्या 15 तुकडय़ा व स्फोटकांची तपासणी करण्यासाठी 15 तुकडय़ा, आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने कारवाई करण्यासाठी 5 विशेष तुकडय़ा, एक बॉम्ब निष्क्रिय दलाची एक तुकडी, गरुडा फोर्स असे नियोजन करण्यात आले आहे.