|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भाताच्या हमीभावाची जबाबदारी सरकार घेणार का?

भाताच्या हमीभावाची जबाबदारी सरकार घेणार का? 

प्रतिनिधी/ बेळगाव

सरकार ऊस, कापूस आदी पिकांना हमीभाव ठरवून देते. मात्र भाताला मात्र कोणत्याही प्रकाराचा हमीभाव ठरविण्यात आलेला नाही. त्यामुळे भाताचे व्यापारी आपल्याला परवडेल अशा दरात भाताची खरेदी करतात. परिणामी अनेकदा शेतकऱयांना नुकसानच सहन करावे लागत आहे. आता भातपिकालाही हमीभाव द्यावा, अशी मागणी ग्रामीण परिसरातील शेतकऱयांमधून व्यक्त होऊ लागली आहे. आस्मानी संकटामुळे अनेकांना फटका बसला आहे.

सोमवारपासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान शेतकऱयांनी शनिवारपासूनच आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र भातासाठी आता पुन्हा शेतकरी आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत. भातालाही हमीभाग देण्यासाठी अनेकांनी मागणी केली आहे. मात्र ज्या ठिकाणी कोणते पिक पिकते त्याला हमीभाव देण्याचे  सोडून भलत्याच पिकांना हमीभाव देण्यात येतो. याचा गांभीर्याने विचार करुन सरकारने भात पिकालाही हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

दरवर्षी शेतकऱयांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. आर्थिक महागाई आणि कामगार वर्गाचे वाढलेले दर यामुळे शेतकऱयांना शेती करणेच मुशकील होऊन बसले आहे. अशातच यावर्षी पावसाने अवेळी हजेरी लावल्याने भात पिकाचे  नुकसान झाले आहे. जोराचा वारा आणि पावसामुळे भात पिके आडवी झाली होती. सध्या मळणीचे काम काही प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी खळय़ातूनच भात विक्री करत आहेत. भात खरेदी करणारे अनेक व्यापारी भात बघून भाताचा दर ठवितात. भाताचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये बासमती, इंद्रायणी, इंटाण, मटाळगा, पुणम, सोनम, दोडगा, हंसा आदी प्रकार आहेत. त्यामुळे भाताचे दरही वेगवेगळे असतात. मात्र भात खरेदी करणारे व्यापारी प्रत्येकवेळी भाताचा वेगवेगळा दर ठरवितात. त्यामुळे बऱयाचदा शेतकऱयांना नुकसान सहन करावे लागते.

कोणत्याही प्रकारच्या भाताला योग्यहमी भाव नसल्यामुळे शेतकऱयांनी कोणत्या दराने भाताची विक्री करावी, हे समजत नाही. त्यामुळे सरकारने प्रत्येक प्रकारच्या भाताला दर ठरवून द्यावा, त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान होणार नाही, याची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे. भाताला योग्य हमीभाव मिळाल्यास शेतकऱयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही. तसेच योग्य हमीभाव मिळावा यासाठी लवकरच आवाज उठविणार आहेत.

काही गावांनी भात पिकाला किती दर द्यावा, हे निश्चित केले होते. मात्र व्यापाऱयांनी गावच्या विरोधात जाऊन भात दर कमी दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या शेतातच भात खरेदी करण्यावर व्यापाऱयांनी आपला कल वाढविला आहे. कडोली येथे इंद्रयणी भाताचा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र व्यापाऱयांनी निश्चित केलेल्या दराला बगल देत कमी दरात भात खरेदी करण्याकडे आपला कल वाढविला आहे. त्यामुळे भातालाही हमीभाव मिळाल्यास शेतकऱयांची फसगत होणार नाही, असे मत अनेकांतून व्यक्त होत आहे.