|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूरचे महापौरपद काँग्रेस-राष्ट्रवादी की भाजपकडे ?

कोल्हापूरचे महापौरपद काँग्रेस-राष्ट्रवादी की भाजपकडे ? 

 ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित आहे. महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरिता मोरे, तर उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे रिंगणात आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी जयश्री जाधव, तर उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे निवडणूक लढवत आहेत.

भाजपनेही निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार उतरवल्याने कोणत्याही क्षणी काहीही होईल, या शक्यतेने काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरत आहेत. महापौर निवडणुकीपूर्वी त्यांचे आदेश महापालिकेत धडकण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक मतदान करण्याऐवजी तटस्थ राहणार आहेत. परिणामी, निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते. राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी तक्रार केली होती. तब्बल दहा महिन्यांनंतर महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरच नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांना नेमके  अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना महापौर निवडणुकीत मतदान करता येणार नाही.