|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » साळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ

साळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ 

प्रतिनिधी/ मिरज

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षणास सोमवारपासून प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदयसिंह माने-पाटील होते. यावेळी मागील वर्षातील विद्यार्थ्यांना मोडी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

  साळुंखे महाविद्यालयात इतिहास विभाग आणि शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गाचे उद्घाटन सोमवारी झाले. स्वागत इतिहासविभाग प्रमुख डॉ. अर्चना जाधव यांनी केले.

   यावेळी बोलताना मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर म्हणाले, मराठेशाहीचा सारा इतिहास मोडी लिपीत आहे. मोडी कागदपत्राच्या वाचनाशिवाय हा इतिहास उजेडात येणार नाही. मराठय़ांच्या इतिहासातील अनेक गुपिते आजही कागदपत्रांत दडली आहेत. राजकीय इतिहासाबरोबरच तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास अभ्यासण्यासाठी मोडी वाचता येणे आवश्यक आहे. त्यामुळे मोडी लिपी शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ पुस्तकी इतिहासावर अवलंबून न राहता मोडी शिकून इतिहासाच्या मूळापर्यंत शिरले पाहिजे. मोडी लिपी हे मराठय़ांच्या वैभवशाली, समृध्द दालनात प्रवेश करण्याचा मार्ग आहे.

  प्राचार्य डॉ. उदयसिंह माने-पाटील म्हणाले, इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी मोडी लिपीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविद्यालयात गेली तीन वर्षे हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. नवी लिपी, नवी भाषा शिकल्याने ज्ञानात भर पडते. व्यक्तिमत्त्व विकासाला या गोष्टी पूरक ठरतात, त्यामुळे या वर्गाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन आजवर उजेडात न आलेल्या इतिहासावर प्रकाश टाकावा, असे आवाहन केले.

  इतिहास विभाग प्रमुख डॉ. अर्चना जाधव म्हणाल्या, महाराष्ट्रात यादव काळापासून मोडी लिपीचा वापर सुरू आहे. 1952 साली ही लिपी शिक्षणक्रमातून कालबाहय़ झाली. मात्र, त्यापूर्वी पाचशे-सहाशे वर्षांतील कागदपत्रे मोडीतच आहेत. केवळ आपल्या राज्यातच नव्हे, राज्याबाहेरही मोडी कागदपत्रे मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे वाचण्यासाठी सध्या मोडीवाचकांची आवश्यकता आहे.

  आभार प्रा. जे. व्ही. आंबवडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. प्रणाली साळुंखे हिने केले. या कार्यक्रमास प्राध्यापकांसह विद्यार्थी उपस्थित होते. या वर्गात सांगली सह मिरज तालुक्यातील विविध वयोगटातील विद्यार्थी, महिला, पुरूष सहभागी झाले आहेत.