|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाण्यासाठी नागरिकांचा साताऱयात उद्रेक

पाण्यासाठी नागरिकांचा साताऱयात उद्रेक 

प्रतिनिधी/ सातारा

गेले दहा दिवसापासून करंजे परिसरात पाण्याची टंचाई होत आहे. त्यावरुन नागरिकांनी जीवन प्राधिकरणाचे अभियंता वडेरा यांना फोनवरुन कल्पना दिली जात होती. तरीही दुरुस्तीचे काम हाती घेतले जात नसल्याने करंजे नाका येथे नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल पाऊण तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नागरिक एवढे संतप्त झाले होते की, प्राधिकरणाचे अभियंता गायकवाड यांनाही मारहाण झाली असती, परंतु खासदार उदयनराजे हे वेळीच पोहोचले अन् त्यांना चांगल्या शेलक्या शब्दात झापले अन् नागरिक शांत झाले. लगेच कामाला सुरुवात झाली.

साताऱयात करंजे परिसरात भुयारी गटर योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे गटर योजनेचे काम सुरु आहे. त्या कामामध्येच गेल्या दहा दिवसापूर्वी जलवाहिनी तुटली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनेकदा पाण्याची टंचाईबाबत फोनवरुन माहिती दिली. परंतु प्राधिकरणाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे सकाळी त्याचा उद्रेक नागरिक रस्त्यावर उतरले. कंरजे नाका येथे रस्त्यावर हंडे, कळशा घेवून महिलांनी रस्ता अडवून ठेवला. संतप्त नागरिकांना प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना बोलवा अशी मागणी केली.

अभियंता संजय गाकवाड यांना ही माहिती समजताच ते आंदोलनस्थळी पोहचले. त्यावेळी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी केली. आंदोलनाची माहिती समजताच माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, राहुल यादव, भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिक आक्रमक झाल्याने बाळासाहेब ढेकणे यांनी उदयनराजे येतात असे सांगून नागरिकांना थांबवले. तोपर्यंत पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी खासदार उदयनराजे यांना घेवून आंदोलनस्थळी पोहचले. उदयनराजेंनी नागरिकांचा पवित्रा पाहिला. त्यांनी नागरिकांना शांत करत गायकवाड यांना शाब्दीक ढोस दिला. त्यामुळे गायकवाड यांनी लगेच जेसीबीच्या सहाय्याने गळती काढण्याचे काम हाती घेतले.

महिला अधिकाऱयाची तर बोबडीच वळली..

आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी प्राधिकरणाची एक महिला अधिकारीही उपस्थित होती. त्या महिला अधिकाऱयांने वरिष्ठांवर नागरिक कसे धावून जातात, प्रश्नांची सरबत्ती करतात हे पाहून त्या महिला अधिकाऱयाची चक्क बोबडीच वळली होती.

प्रतापगंज पेठेतही रास्ता रोको

प्रतापगंज पेठेतील नामदेव माळ झोपडपट्टीकडे जाणाऱया नलिकेची दुरुस्ती करण्याबाबतही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रतापगंज पेठेतही रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु तेथे वेळीच पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर हे पोहचले अन् नागरिकांना आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले.