|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » जर्मनीला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

जर्मनीला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था /भुवनेश्वर :

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत गुरूवारी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया बलाढय़ जर्मनीला 2-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

जर्मनीने यापूर्वी ही स्पर्धा दोनवेळा जिंकून आपला दर्जा सिद्ध केला. गुरूवारच्या सामन्यात त्यांना बेल्जियमकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक हॉकी मानांकनात तिसऱया स्थानावर असलेल्या बेल्जियतर्फे या सामन्यात 18 व्या मिनिटाला ऍलेक्सझांडेर हेंड्रिक्सने तर 50 व्या मिनिटाला टॉम बूनने गोल नोंदविले. जागतिक हॉकी मानांकन सहाव्या स्थानावर असलेल्या जर्मनीतर्फे या सामन्यात एकमेव गोल 14 व्या मिनिटाला डिटेर लिनेकोगेलने नोंदविला. आता या स्पर्धेत शनिवारी बेल्जियम आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.

गुरूवारच्या सामन्यात सातव्या मिनिटाला बेल्जियमला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण बेल्जियमच्या खेळाडूंना याचा लाभ घेता आला नाही. जर्मनीने आक्रमक खेळावर भर दिला आणि 14 व्या मिनिटाला लिनेकोगेलने आपल्या संघाचे खाते उघडून बेल्जियमवर आघाडी घेतली. बेल्जियमने प्रति आक्रमणे अधिक केली. त्यामुळे त्यांना पाठोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते वाया गेले. 18 व्या मिनिटाला मिळालेल्या पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर हेंड्रिक्सने गोल नोंदवून बेल्जियमला  बरोबरी साधून दिली. दुसऱया 15 मिनिटाच्या कालावधीत बेल्जियमला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले तर जर्मनीच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने बेल्जियमला आघाडी मिळू दिली नाही. 37 व्या मिनिटाला बेल्जियमला आठवा पेनल्टी कॉर्नर मिळाला तर  39 व्या मिनिटाला नववा पेनल्टी कॉर्नर मिळूनही बेल्जियमला आघाडी घेता आली नाही. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना टॉम बूनने मैदानी गोल नोंदवून आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.