|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘संजीवनी’ गळीत हंगाम उद्यापासून

‘संजीवनी’ गळीत हंगाम उद्यापासून 

प्रतिनिधी /धारबांदोडा :

धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यावर घातलेली बंदी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागे घेतल्यामुळे कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी सकाळी कारखान्याच्या आवारात गळीत हंगामपूर्व पूजाविधी पार पडले. अधिकृत गळीत हंगाम उद्या 15 डिसें.पासून सुरु होणार असल्याने ऊस उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संजीवनीसह देशभरातील साधारण सहाशे साखर कारखान्यांना प्रदूषण मापक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र संजीवनीकडून या आदेशपत्राला कोणतेच उत्तर न मिळाल्याने कारखाना बंद ठेवण्याचा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केला होता.

ऊस पिकून गळीत हंगाम सुरु करण्याची वेळ आली तरीही कारखाना सुरु होण्याची कुठलीच चिन्हे नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याची परिणती म्हणून राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकऱयांना आंदोलन करावे लागले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी मध्यस्थी करुन अखेर ही प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या यंत्रणेची चाचणी घेऊन त्यासंबंधीचा अहवाल दिल्यानंतर हा अहवाल दिल्लीला पाठविण्यात आला.  कारखान्याचे प्रशासक दामोदर मोरजकर यांनी स्वत: दिल्लीला जाऊन हा अहवाल सादर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी कारखान्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. सध्या ऊस गाळप प्रक्रियेची तांत्रिक चाचणी सुरु करण्यात आली असून उद्यापासून गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे.