|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पुण्यातील आयटी कंपन्यांना सोलापूर हाच सक्षम पर्याय ; 32 एकरांवर साकारले जातेय अतिभव्य आयटी संकुल

पुण्यातील आयटी कंपन्यांना सोलापूर हाच सक्षम पर्याय ; 32 एकरांवर साकारले जातेय अतिभव्य आयटी संकुल 

पुणे / प्रतिनिधी :

आयटीच्या निमित्ताने देशभरातील तरूणांच्या लोंढय़ांनी व्यापून गेलेल्या पुण्यात आता अनेक अडचणी निर्माण झाल्या. वाहतुकीच्या समस्येवर मार्गच सापडत नसल्याने काही कंपन्या पुण्यातून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. अशा कंपन्यांना आता सोलापूर खुणावतोय. स्मार्ट शहर म्हणून विकसित होत असलेल्या सोलापूरात अतिभव्य आयटी पार्क साकारण्यात येत आहे. यासंबंधी नामवंत कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चाही झाली असुन त्याला सकारात्मक प्रतिसाद असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते व माजी महापौर महेश कोठे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आयटी तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, विवेक दिक्षित आदी उपस्थित होते.

पुण्यातल्या आयटी कंपन्यांना सोलापूरच्या या आयटी पार्कची माहिती देण्यासाठी येत्या बुधवारी पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये उद्योजकांशी चर्चा आयोजित केली आहे. त्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त डॉ. अविनो ढोकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. ‘सोलापूर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने 32 एकर जागेत सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा आयटीपार्क उभारण्यात येत आहे. सर्व सोयींनी व सुसज्जरित्या उभारण्यात येणाऱया या आयटी पार्कमुळे सोलापूर शहरातील कित्त्येक बेरोजगार तरूणांना रोजगार मिळू शकतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.