|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » यूपी योद्धाचा यू मुम्बावर विजय

यूपी योद्धाचा यू मुम्बावर विजय 

वृत्तसंस्था/ कोलकाता

येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानावर झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात यूपी योद्धाने यू मुम्बचा 34-32 अशा गुणांनी पराभव केला.

प्रशांत कुमार रायने (8 गुण) शेवटच्या मिनिटाला चढाईचे दोन गुण मिळविल्याने यूपी योद्धाला विजय मिळविता आला. यू मुम्बासाठी हा दिवस निराशाजनक ठरला असून सिद्धार्थ देसाई व रोहित राणा हे त्यांचे दोन प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. या पराभवामुळे यू मुम्बाला ए झोनमध्ये अव्वल स्थान मिळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. तरीही प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याची अल्पशी संधी आहे. योद्धासाठी सचिन कुमारने बचावफळीत उत्कृष्ट कामगिरी करीत पकडीचे 6 गुण मिळविले तर रिशांक देवाडिगाने चढाईत 7 गुण मिळविले. मध्यंतराला योद्धा संघ 18-15 असा आघाडीवर होता. 23 व्या मिनिटाला यू मुम्बाने ऑलआऊट करून 20-20 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र दोन्ही संघांनी अटीतटीचा खेळ करीत 38 व्या मिनिटाला 31-31 अशी बरोबरी साधली. योद्धाच्या दर्शन कडियानने बचावात चूक केल्याने 40 व्या मिनिटाला लढत 32-32 अशी बरोबरीत आली. मात्र सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना प्रशांतने चढाईचे दोन गुण मिळवित योद्धाला 34-32 असा निसटता विजय मिळवून दिला.