|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मंत्रिमंडळ विस्तारानंतरही सरकार अस्थिरतेच्या फेऱयात!

मंत्रिमंडळ विस्तारानंतरही सरकार अस्थिरतेच्या फेऱयात! 

युती सरकार अस्थिर करण्यासाठी जसे प्रयत्न सुरू आहेत तसे ते वाचविण्यासाठीही काँग्रेस आणि निजद नेत्यांची धडपड सुरू आहे. या प्रयत्नात कोणाला यश येणार, वाचविणाऱयाला की पाडविणाऱयाला, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

ठरल्याप्रमाणे 22 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. रमेश जारकीहोळी व शंकर या दोन मंत्र्यांना वगळून काँग्रेसने एकूण आठ आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. एच. के. पाटील, रामलिंगा रेड्डी, बी. सी. पाटील आदींसह अनेक ज्ये÷ आमदार मंत्रिपदापासून वंचित राहिले. त्यामुळे काँग्रेसमधील धूसफूस वाढतीच आहे. एकीकडे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांची संख्या जशी वाढती आहे तशी पक्षांतर्गत असंतोषामुळे काँग्रेसमध्ये गटबाजीही उफाळली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अत्यंत चाणाक्षपणे प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत परिस्थिती आपल्या बाजूने वळविण्याचे काम करीत आहेत. या कामात ते काही प्रमाणात यशस्वीही ठरले आहेत. आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर व प्रभावी मंत्री डी. के. शिवकुमार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी फासे टाकले आहेत. उत्तर कर्नाटकातील प्रभावी नेते एम. बी. पाटील यांना गृहमंत्रीपद देण्यासाठी सिद्धरामय्या उत्सुक आहेत. मात्र, डॉ. परमेश्वर गृहमंत्रीपद सोडण्यास राजी नाहीत. याच मुद्दय़ावरून काँग्रेसमध्ये सध्या बेबनाव वाढत चालला आहे. जसे डॉ. परमेश्वर व डी. के. शिवकुमार यांचा पक्षातील व सरकारमधील प्रभाव कमी करण्यासाठी सिद्धरामय्या प्रयत्न करीत आहेत तसेच प्रयत्न सिद्धरामय्या यांना कमकुवत बनविण्यासाठी त्यांचा विरोधी गट करीत आहे.

मंत्रिपद गमावल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून रमेश जारकीहोळी शांत आहेत. या काळात ते कुठेही चर्चेत नाहीत. त्यांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकाचे काँग्रेस प्रभारी खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. स्वतः सिद्धरामय्या यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणाशीही बोलणे टाळत आहेत. गुरुवारी रमेश जारकीहोळी मुंबईला गेले आहेत. बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनेत्यांची बैठक घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते हे बेळगावला आले होते. त्यामुळे माजी मंत्री रमेश कत्ती यांनी येत्या चोवीस तासात युती सरकार गडगडणार, असे भाकित करतानाच पंधरवडय़ात आमची ताकद काय आहे, हे आम्ही दाखवून देतो, असे म्हटले होते. चोवीस तासानंतर सरकार सुरक्षित असले तरी रमेश जारकीहोळी यांच्या मुंबई दौऱयामुळे काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रमेश जारकीहोळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार, अशी माहिती आहे. यावरून युती सरकार अस्थिर बनविण्यासाठीचे प्रयत्न अद्याप थांबलेले नाहीत, हे स्पष्ट होते.

रमेश जारकीहोळी यांची पुढची वाटचाल काय असणार, ते कोणती भूमिका घेणार हे अद्याप अस्पष्ट असले तरी सध्या ते मनाने काँग्रेसबाहेर आहेत, हे दिसून येते. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर लगेच ते आपला निर्णय जाहीर करणार, अशी अटकळ होती. मात्र, संख्याबळाचा अभाव किंवा आणखी काही राजकीय धोरणामुळे सध्या मौन पाळणेच त्यांनी पसंत केले असले तरी लवकरच त्यांच्या मनातील असंतोषाचा स्फोट होणार याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत. म्हणूनच के. सी. वेणुगोपाल, सिद्धरामय्या यांच्याबरोबरही ते बोलणे टाळू लागले आहेत. काँग्रेसने त्यांचे बंधू सतीश जारकीहोळी यांच्यावर त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे. केवळ रमेशच नव्हे तर त्यांच्या समर्थकांची मनधरणी करण्याची जबाबदारीही पक्षाने सतीश जारकीहोळी यांच्यावर सोपविली आहे. युती सरकार अस्थिर करण्यासाठी जसे प्रयत्न सुरू आहेत तसे ते वाचविण्यासाठीही काँग्रेस आणि निजद नेत्यांची धडपड सुरू आहे. या प्रयत्नात कोणाला यश येणार, वाचविणाऱयाला की पाडविणाऱयाला, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

काँग्रेसबरोबरच आता निजदमध्येही पक्षांतर्गत असंतोषाचा भडका उडाला आहे. माजी मंत्री व विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी सिद्धरामय्या यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. युती सरकार स्थापन करताना काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता अटी लादण्यात येत आहेत, असे सांगतानाच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. कारण बेळगाव येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी विधान परिषद सभापतीपदावरून त्यांना बाजूला काढून त्यांचा अपमान करण्यात आला होता. बसवराज होरट्टी हे उत्तर कर्नाटकातील एक प्रभावी नेते आहेत. सातत्याने शिक्षक मतदारसंघातून ते विधान परिषदेत प्रवेश करीत आले आहेत. त्यांचा अनुभव किंवा ज्ये÷तेचा विचार न करता त्यांना बाजूला काढण्यात आले आहे. याची सल त्यांना आहेच. त्यामुळेच आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध ते उघडपणे टीका करू लागले आहेत. यावरून कोणत्याच पक्षात आलबेल नाही, हे स्पष्ट होते.

एकीकडे राजकीय घडामोडी गतिमान झालेल्या असतानाच दुसरीकडे वादग्रस्त लेखक प्रोफेसर भगवान यांच्या ‘राममंदिर का नको?’ या पुस्तकावरून गदारोळ उठला आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. या पुस्तकात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम व सीतेवर बेछूट टीका केली आहे. या टीकेला भगवान यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार जोडल्याची पुस्ती दिली आहे. या ना त्या कारणावरून भगवान नेहमी चर्चेत असतात. खासकरून देवदेवतांच्या अस्तित्वावर ते नेहमी वादग्रस्त लिखाण करीत असतात. त्यांच्या या पुस्तकामुळे ते पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनले आहेत. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उडुपी दौऱयावर होते. पेजावर मठाधीश श्री विश्वेशतीर्थ यांनी संन्यासधर्म दीक्षा घेऊन 80 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती उडुपीला आले होते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे केवळ भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगाचे आदर्श पुरुष आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. भगवान यांच्या पुस्तकावर टीका होत असतानाच राष्ट्रपतींनी श्रीरामांचे महात्म्य अधोरेखित केले आहे. आता भगवान यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी वाढू लागली आहे.