|Sunday, June 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘श्रेयस तळपदे’चे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन

‘श्रेयस तळपदे’चे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन 

आजवर चित्रपटांमधून दिसलेला श्रेयस तळपदे लवकरच छोटय़ा पडद्यावर पुन्हा एण्ट्री घेणार आहे. ‘माय नेम इज लखन’ या सोनी सबवरील नव्या मालिकेमध्ये तो झळकणार आहे. या मालिकेबद्दल बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला की, यामध्ये मी लखन या मोठय़ा डॉनसाठी काम करणाऱया स्थानिक गुंडाची भूमिका साकारत आहे. आपले जीवन जगण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, यावर त्याचा ठाम विश्वास आहे. पण त्याच्या आयुष्यात अचानकपणे घडलेल्या एका प्रसंगामुळे विलक्षण बदल घडतात. तेव्हापासून एक माणूस म्हणून त्याचा बदलाचा प्रवास सुरू होतो. या संपूर्ण बदलाच्या प्रवासात त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते, वेगवेगळी माणसे त्याला भेटतात. तो या सगळय़ा गोष्टींना त्याच्या या प्रवासात कशाप्रकारे सामोरा जातो हे कमालीचे रंजक आहे आणि हीच गोष्ट मला खूप भावली. त्यामुळेच मी या मालिकेत काम करायला तयार झालो.

   आपण जसा चित्रपट वा मालिकेत बघतो तसा सरधोपट गुंडाचा लुक माझा या मालिकेत नाहीये. उलट तो आजच्या मुंबईकर तरुणासारखा आहे. लखन एकदम उमद्या मनाचा आणि पुरेपूर पॅशनची जाणीव असलेला तरुण आहे. पण त्याची भाषा मात्र त्याच्या पेहरावापेक्षा थोडी हटके आहे. लखनची मला खरोखर आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा दिमाख आणि तोरा. त्याच्या व्यक्तिमत्वात काही प्रमाणात चांगुलपणा असून काही प्रमाणात वाईटपणाही भरलेला आहे. ही गोष्ट आपल्या सगळय़ांच्या बाबतीत खरी आहे. त्यामुळे त्याच्या वागण्याबद्दल त्याच्या वडिलांना काही आक्षेप असला तरी तो करत असलेली कोणतीही गोष्ट त्या-त्या वेळी तुम्हालाही बरोबरच वाटेल. टीव्हीवर यायला तुला इतका वेळ का लागला असे विचारल्यावर श्रेयस म्हणाला की, हीच गोष्ट जर आपण दुसऱया बाजूने पाहिली तर असे म्हणता येईल की यासारखी मालिका घेऊन माझ्याकडे यायला टीव्हीलाच खूप वेळ लागला. वेब आणि चित्रपट यामुळे टीव्हीला ज्या प्रचंड स्पर्धेला सध्या तोंड द्यायला लागत आहे, त्यामुळेच टीव्हीचे अशाप्रकारे कमबॅक झाले असावे, असे मी म्हणू शकतो. त्यामुळेच ते सध्या वेगवेगळे प्रकार घेऊन येत आहेत आणि मर्यादित भागांच्या मालिकेचा हा प्रकार मला भावला. ही मर्यादित अशा 29 भागांची मालिका असून तिचे लेखन, संकल्पना अफलातून आहे. अर्थातच एक अभिनेता म्हणून मला खूप चांगली भूमिका मिळाली आहे. भूमिका जर मला भावली तर मी कधीच भाषा, माध्यम यांची फिकीर करत नाही.

   माझ्या करिअरची सुरुवात नाटकापासून झाली नंतर हिंदी टीव्हीवर काही छोटय़ा भूमिका केल्या. मग काही मोठय़ा भूमिका मी मराठी टेलिव्हिजनवर साकारल्या. आजच्या काळात टीव्हीची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे मराठी असो वा हिंदी, चित्रपट आणि टीव्ही आणि आता वेब यामधली सीमारेषा खूप जास्त नाहीये. केवळ पैसाच नाही तर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी प्रचंड प्रयत्न या सगळय़ाच माध्यमात केले जात आहेत, असे श्रेयसने सांगितले.