|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » शिर्डीसाठी ‘स्पाइसजेट’ची खास विमानसेवा सुरू

शिर्डीसाठी ‘स्पाइसजेट’ची खास विमानसेवा सुरू 

ऑनलाईन टीम / शिर्डी :

6 जानेवारीपासून देशातल्या 10 ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. ‘स्पाईसजेट’ या खासगी विमान कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे दूरवरून शिर्डीत येणाऱया साईभक्तांना दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही. एकूण 20 विमानांचे शिर्डीत आगमन आणि उड्डाण होणार आहे. यात हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूर, इथूनही विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. तर चेन्नईहून येत्या 10 जानेवारीपासून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

याचबरोबर प्रत्येक आठवडय़ात मंगळवार आणि रविवार या दोन दिवशी हैद्राबादसाठी प्रत्येकी एका विमानाची अतिरिक्त फेरी सुरू करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळीदेखील विमानाच्या आगमनाची सुविधा करण्यात येणार आहे. अर्थातच, आगामी काळात देशातील महत्त्वाची शहरे विमानसेवेच्या माध्यमातून शिर्डीशी जोडली जाणार असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. पुढील काही महिन्यांत शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरविण्याची सुविधा सुरू होईल. त्यानंतर विमानांची संख्या वाढवण्यात येऊ शकते. यापूर्वी प्रवाशांना मुंबई आणि पुण्याला येऊन पाच ते सात तासांचा पुन्हा प्रवास करून शिर्डीला यावे लागत होते. शिर्डीत 1 ऑक्टोबर 2017 रोजी विमानतळाचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते.