|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर लोकल धावणार

मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर लोकल धावणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मध्ये रेल्वेकडून पुणे-मुंबई आणि मुंबई-नाशिक या रेल्वेमार्गावर लोकल धावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्याची चाचणी 10 जानेवारीनंतर कधीही होऊ शकते. चाचणी यशस्वी झाल्यास लोकल धावेल, अशी माहिती मध्ये रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

या दोन्ही रेल्वेमार्गावर घाट असल्याने चाचणीसाठी विशेष लोकलची रेक चेन्नईच्या कारखान्यातून आणण्यात येणार आहे. रेक आल्यानंतर चाचणी घेतली जाईल, असेही रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले. पुणे-मुंबई आणि मुंबई-नाशिक रेल्वेमार्गांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकलची सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची आणि चाकरमान्यांची मागणी होती. प्रवासी रेल्वे संघटना आणि लोकप्रतिनिधींनीही याबाबत वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा रेटा वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दोन्ही रेल्वेमार्गांवर लोकल सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही रेल्वेमार्गांवर घाट सेक्शन असल्याने नॉर्मल लोकलची रेक धावू शकत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीकडे (आयसीएफ) विशेष लोकल तयार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ’आयसीएफ’ने ही विशेष लोकल तयार केली आहे. ही विशेष लोकल 10 जानेवारीनंतर कधीही मुंबईच्या रेल्वे यार्डात दाखल होऊ शकते. ही लोकल आल्यानंतर तिची दोन्ही रेल्वेमार्गांवर चाचणी घेण्यात येणार आहे.