|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची विद्यापीठावर धडक

आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची विद्यापीठावर धडक 

वार्ताहर/ मौजेदापोली

आंबेनळी घाट बस अपघातातील मृत बस चालक प्रशांत भांबीड यांच्यावर पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभुमीवर अपघातग्रस्तांच्या नातलगांनी बुधवारी दापोली कोकण कृषी विद्यापीठावर धडक देत कुलसचिव सुभाष चव्हाण यांना निवेदन सादर केले. ज्या अहवालाद्वारे पोलिसांनी मृत बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे, त्या विद्यापीठ चौकशी समितीसोबत समोरासमोर चर्चा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. तसेच याप्रकरणी भावनिक उद्रेक झाल्यास त्यास विद्यापीठ जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.

  महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात दापोली विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातातून प्रकाश सावंतदेसाई हे एकमेव प्रवासी वाचल्याबद्दल नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दापोलीतील अनेकांनी सावंतदेसाईंच अपघाताताला जबाबदार असल्याचा आरोप करता सीआयडी, सीबीआयमार्फत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेटून केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी मान्यही केली होती. त्यातच विद्यापीठ समितीच्या 12 अधिकारी व कर्मचाऱयांच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात चालक प्रशांत भांबीड हेच बस चालवत असल्याचे नमूद केले होते. या नोंदीचा निष्कर्ष काढून पोलादपूर पोलिसांनी भांबीड यांच्यावर 5 महिन्यांनंतर गुन्हा दाखल केल्याने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह दापोलीकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 आंबेनळी येथील अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर या अपघातातून चालकाशिवाय कुणीही वाचू शकत नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तसेच  प्रकाश सावंतदेसाई यांच्या विविध वक्तव्यातून विसंगती दिसत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी न करता मृताविरूद्ध तब्बल 5 महिन्यानंतर गुन्हा नोंदवला हेच आमचे दुर्दैव असल्याचे नातेवाईकांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात ज्यांच्या अहवालाद्वारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे, त्या  समितीसोबत समोरासमोर चर्चेची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा लोकांचा भावनिक उद्रेक झाला तर त्यास विद्यापीठ जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

  दापोली विद्यापीठाला देण्यात आलेल्या पत्रावर पी. एन. चौगुले, शमिका गुजर, श्रावणी झगडे, रेवा जाधव, सृष्टी झगडे, स्मिता झगडे, श्रावणी झगडे, सानवी गिम्हवणेकर, ऋतुजा भांबीड, प्रमिला सावंत, सुविधा कदम, श्रद्धा शिगवण, श्रद्धा सुर्वे, निधी पागडे, दिनेश तांबे, विनायक पागडे, रामचंद्र कदम, स्नेहा जालगावकर, विनया शिंदे, सायली साठले यांच्या स्वाक्षऱया आहेत. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांच्या विद्यापीठ भेटीवेळी दापोलीतील प्रतिष्ठीत नागरिक व विविध पक्षांचे नेते मंडळीही उपस्थित होती.

 अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसमोर विद्यापीठ समिती बसणार का?

पोलादपूर पोलिसांनी मृत भांबीडवर गुन्हा दाखल केल्यानंतर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी विद्यापीठाला दिलेल्या धडकेमुळे पुन्हा आंबेनळी अपघात प्रकरण चर्चेत आले आहे. विद्यापीठाच्या ज्या समितीच्या अहवालाच्या सहाय्याने गुन्हा दाखल झाला त्या समितीसमोर चर्चा करण्याची मागणी करण्यात आल्याने आता ही समिती या नातेवाईकांसमोर चर्चेसाठी बसणार की नाही? आणि जर बसली तर समितीच्या चर्चेत या प्रकरणाचे पुढे काय होणार, याकडे  दापोलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.