|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » विद्यापीठातील पदवीदान समारंभात पुणेरी पगडीचा वाद ; चार विद्यार्थी ताब्यात

विद्यापीठातील पदवीदान समारंभात पुणेरी पगडीचा वाद ; चार विद्यार्थी ताब्यात 

ऑनलाईन टीम / पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळय़ात शुक्रवारी पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन सुरु असलेला वाद उफाळून आला. पदवीदान सोहळय़ादरम्यान पुणेरी पगडीला विरोध दर्शवत चार विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या चारही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळय़ात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन डेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. विद्यापीठ प्रशासनाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी वर्षांनुवर्षे असलेला हा पोशाख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार 11 जानेवारीला (शुक्रवारी) होणाऱया पदवीप्रदान कार्यक्रमासाठी कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख असेल, असे स्पष्ट करण्यात आले. गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा यावरुन वाद निर्माण झाला होता.

 

शुक्रवारी पदवीदान समारंभ सुरु असताना चार विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या, अशी मागणी हे विद्यार्थी करत होते.