|Sunday, June 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चीनची ऐतिहासिक चांद्रमोहीम

चीनची ऐतिहासिक चांद्रमोहीम 

चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले त्याला यावर्षी 24 जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण होतील. चंद्राला प्रथम पादस्पर्श करणारे अंतराळवीर अमेरिकन होते, परंतु त्या अलौकिक घटनेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची संधी चीनला मिळाली आहे. नव्या वर्षाच्या तिसऱयाच दिवशी चीनचे ‘चँग-इ’-4 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरले.

चंद्रावर अंतराळयाने पाठवण्याच्या कित्येक मोहिमा आजवर झाल्या, भारताने तर मंगळावर यान उतरवले, असे असताना चीनच्या या चंद्र मोहिमेचे कौतुक कशाला करायला हवे असा प्रश्न एखादा विचारू शकेल. प्रश्न चुकीचा ठरणार नाही, परंतु कौतुकापेक्षाही या मोहिमेचे ‘महत्त्व’ कोणते हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल.

‘चँग-इ-4 हे चिनी यान चंद्राच्या पलीकडच्या बाजूला गेले आहे. चंद्राचा जो पृष्ठभाग आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही, आजवर त्या भागावर कोणत्याही मोहिमेतील अंतराळवीर अथवा याने उतरली नाहीत अशा चंद्रीय प्रदेशात ‘चँग-इ-4’ उतरले आहे. त्या अर्थाने चीन हा मानकरीच म्हणायला हवा. बीजिंगमध्ये 3 जानेवारी रोजी सकाळचे 10 वा. 26 मिनिटे झाली होती. (म्हणजे आपण सकाळच्या चहा-न्याहरीचा आस्वाद घेत होतो.) तेव्हा ही ऐतिहासिक घटना घडली. मराठी भाषेत प्रकाशित होणाऱया बहुतेक वर्तमानपत्रांनी या घटनेची दखल घेतली नसती तरी इंग्रजीतील अद्ययावत माध्यमांनी ‘ऐतिहासिक’ असे वर्णन करून तिचा वृत्तांत छापला आहे.

या ‘ऐतिहासिक’ मोहिमेमुळे चंद्राच्या आजवर अपरिचित राहिलेल्या भागाची माहिती मिळवता येईल. ‘साऊथ पोल ऐटकन बेसिन’ नावाने ओळखला जाणारा चंद्राचा अपरिचित भाग म्हणजे चंद्राच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या प्रचंड नैसर्गिक उलथापालथीचा एक परिणाम. त्या उलथापालथीमध्ये चंद्रावर अति विस्तीर्ण असा खोरेसदृश प्रदेश तयार झाला. त्याचे संशोधन झाल्याने पृथ्वीच्या 38 ते 43 लक्ष वर्षापूर्वीच्या अवस्थेचा मागोवा घेता येईल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

काही शास्त्रज्ञांच्या मते आजवर मानवाला अपरिचित राहिलेली चंदामामाची ती बाजू म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीच्या रहस्याचे कुलुपबंद कपाटच आहे जणू. आजीच्या बटव्यात कशा कितीतरी गोष्टी सापडतात, तसा तो प्रदेश म्हणजे खगोलीय इतिहासाची बखर असावी असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

चांद्र पृष्ठावरील ते अतिविस्तीर्ण खोरे हीदेखील अशीच एक खजिन्याने भरलेली पेटी आहे. त्यातील अतिव खोल घळीमध्ये चंद्राच्या गाभ्यातील पदार्थांशी संबंधित वस्तू सापडण्याची शक्यताही वाटते.

या एकूणच चांद्र मोहिमेचा उद्देश व्यापक संशोधनाचा आहे. लघुतरंग लहरींद्वारे खगोलशास्त्राrय निरीक्षणे, चांद्र पृष्ठावरचे खड्डे आणि उंचवटे यांचा अभ्यास व विश्लेषण, खनिज मागोवा, न्यूट्रॉन किरणोत्सवर्गाची मोजणी अशा अनेक बाबींचा या संशोधनात समावेश असेल.

‘चँग-इ-5’ या पुढच्या चांद्रमोहिमेसाठी उपयोगी पडतील का याची तपासणी करण्यासाठी काही दगड-मातीही यानात घालून चीनमध्ये आणायची आहे.

याशिवाय आणखी एक महत्त्वाचा उद्देश या मोहिमेमागे आहे. अफाट विश्वाची निर्मिती कशामुळे झाली हा शास्त्रज्ञांना पडणारा अगदी मूलभूत प्रश्न. अनेक सिद्धांत मांडले जाऊनही त्याचे संपूर्ण समाधानकारक उत्तर काही अद्याप मिळालेले नाही. ‘कशाचा तरी’ स्फोट होऊन विश्वाची निर्मिती झाली यावर सगळेजण एकमत दर्शवतात. परंतु ‘महाविस्फोटा’चे (बिगबँग) नेमके कारण काय ते उमजले नाही. या मोहिमेतून त्याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न राहील.

या मोहिमेचे आंतरराष्ट्रीय संदर्भात असणारे महत्त्व दुहेरी आहे. एका बाजूने अनेक वैश्विक रहस्ये उलगडणारे संशोधन त्यानिमित्ताने होईल, तर दुसरीकडे यातून प्राप्त होणारी माहिती आणि पदार्थ यांच्या स्वामित्वावर चीनचा प्राधान्यक्रम राहील, कारण आजवर चंद्राच्या त्या बाजूकडे कोणी फिरकले नव्हते.

चंद्राभोवती पृथ्वीसारखे वातावरण नाही हे सर्वांना ठाऊक आहे. चिनी अंतराळतज्ञांनी या यानातून पृथ्वीवरील काही वनस्पती आणि सजीव पाठवले. त्यामध्ये बटाटय़ाचे बियाणे (मोड), मोहरी आणि रेशमाच्या किडय़ांची अंडी हे पदार्थ आहेत. हेतू हा की रेशमाचे किडे कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकतात आणि वनस्पतींतून ऑक्सिजन बाहेर पडतो. हे दोन्ही वायू प्राणी जीवनाला आवश्यक असतात. याचा अर्थ चंद्रावरील वास्तव्यासाठी ऑक्सिजनचे सिलिंडर पृथ्वीवरून घेऊन जाण्यावर दुसरा उपाय शोधण्याचा प्रारंभ झाला आहे असाही घेता येईल. हे पदार्थ सुरक्षित आणि ताजे टवटवीत रहावेत यासाठी एक खास डबा तयार करण्यात आला आहे. अवघ्या सात इंच लांबीचा तो
ऍल्युमिनिअमचा डबा बनवण्यासाठी जगातल्या 28 विद्यापीठांमधल्या प्रयोगशाळांनी आपापला वाटा उचलला आहे, गंमत आहे नाही?

चिनी कथेतील चँग या चांद्रदैवताचे नाव दिलेली अशी तीन चिनी याने 2007 पासून अंतराळात झेपावली हे चौथे, यानंतर पाचवेही जाणार आहे आणि 2030 साली माणसे घेऊन जाणारी चांद्रमोहीम राबवण्याचा चीनचा मानस आहे.