|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फणसाचे गरे, ओल्या काजूगरांना सोन्याचा भाव!

फणसाचे गरे, ओल्या काजूगरांना सोन्याचा भाव! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

थंडीची चाहुल लागली की कोकणात आंबे, फणस, काजूची झाडे मोहरू लागतात. पोषक वातावरण लाभल्यास हंगामापूर्वीच फळधारणा होऊन त्याची चव खवय्यांना चाखायला मिळते. सध्या रत्नागिरीच्या बाजारात हापूस आंब्यापाठोपाठ फणस व कच्च्या काजूची आवकही झाली आहे. पण कच्च्या फणसालाही सोन्याचा भाव मिळू लागला असून भाजीचे गरे 200 ते 250 रुपये किलो तर ओले काजूगर 1200 रु. किलो दरांने विकले जात आहेत.

 आंब्याबरोबरच फणसाचे जास्त उत्पादन कोकणात होते. कोकणातील फणस अनेकविध भागांत विक्रीसाठी येत असतो. आता तर कच्च्या फणसापासूनही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. सध्या फणसाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढलेला दिसत आहे. परंतु मोठय़ा प्रमाणात गावठी फणस तयार होण्यास फेब्रुवारी उजाडतो.  मात्र त्यापूर्वी अनेक भागात पोषक हवामानामुळे काही झाडांना लवकर फळधारणा होते. त्यामुळे लवकर तयार झालेले फणस सध्या येथील बाजारात दाखल झाले आहेत. हरचेरी व पावस भागातील बागांमधून तयार झालेले फणस बाजारात विक्री होताना दिसून येतात.

   ओल्या काजूगरांची बाजारात मोठी आवक

दरवर्षी पौष महिना लागताच साऱयांनाच फणसाच्या कुयऱयांर्चीं भाजी खाण्याची आस लागते. पण थंडीच्या काळात कुयऱयांसोबत कच्चे फणसही उपलब्ध झाले आहेत. या फणसाच्या कच्च्या गऱयांचा दरही पावकिलोला 50 रु. इतका आहे. लवकर फणस दाखल झाल्याने त्याला भावही चांगला मिळत असल्याचे विक्रेते सतीश पोवार यांनी सांगितले. आवक वाढली की, हे दर कमी होत असतात. तसेच ओल्या काजू गरांची उसळ पाहून साऱयांच्याच जिभेला पाणी सुटते. अशा ओल्या काजूगरांची मोठी आवक बाजारात उपलब्ध झाली आहे. येथील ग्रामीण भागातून ओले काजूगर उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यांचा दरही पावकिलोला 350 रु. इतका असल्याचे दिसून येत आहे. सध्या सामान्य ग्राहक हे दर पाहून काहीसा दूरूनच जात असल्याचे पहावयास मिळते.