|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बायणात घराला आग, पूर्ण घरसंसार जळून खाक

बायणात घराला आग, पूर्ण घरसंसार जळून खाक 

प्रतिनिधी/ वास्को

वास्को बायणातील एका चाळवजा घराला लागलेल्या आगीत घरासह कुटुंबाच्या पूर्ण संसाराची राख झाली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा स्पष्ट झालेला नाही. अग्नीशामक दलाने सुमारे अडिच तास खर्ची घालून ही आग विझविण्यात यश मिळवले. अन्यथा शेजारच्या घरांनीही पेट घेतला असता.

बायणातील एमपीटी मैदानाच्या मागच्या बाजुला असलेल्या चाळवजा घरात ही आग लागली. या ठिकाणी दाटीवाटीने घरे असून आग लागलेल्या घराला जोडून अनेक छोटी छोटी घरे आहेत. या आगीने या वस्तीलाच धोका निर्माण केला होता. मात्र, अग्नीशामक दलाला ही आग थोपवण्यास यश आले. दाट वस्तीमुळे बचाव कार्यात अडथळे येऊनही सुमारे अडिच तासात अग्नीशामक दलाने धोका दूर केला.

उपलब्ध माहितीनुसार जमील शेख यांच्या घरात ही आगीची ठिणगी पडली. हे घर तीन खोल्यांचे असून या घरात आई वडिल व दोन मुले असे कुटुंब राहते. संध्याकाळी जमील शेख हे कुटुंब प्रमुख कामावर गेलेले होते. त्यांची पत्नी दरवाजाला कुलुप लावून बायणातील बाजारात गेली होती. मुलगी टय़ुशनला गेली होती तर त्यांचा मुलगा घराबाहेरच खेळत होता. घरात कुणीच नसल्याने घरामध्ये आगीची ठिणगी पडल्याचे कुणालाच समजू शकले नाही. मात्र, साडे सातच्या सुमारास या छोटय़ाशा घराचे छप्पर कोसळल्यानंतर घरामध्ये आग भडकत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्वरीत अग्नीशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत हे घर आगीत भस्मसात झाले. बराच वेळ आग घरात धुमसत होती. त्यामुळे घरातील सर्व साहित्य व घराच्या छप्परासह राख झाले. या घरातील गॅस सिलिंडरचाही या आगीत स्फोट झाला. हे घर मातीच्या भिंतीचे आहे. घरातील टी.व्ही., फ्रिझ, फर्निचर, भांडीकुंडी व कपडेलत्ते अशा वस्तू व साहित्यासह या कुटुंबाचा पूर्ण संसार या आगीच्या घटनेत बेचिराख झाला. शेजारच्या एका घरालाही या आगीची झळ बसली. मात्र, या घटनेतील नुकसानीचा एकूण निश्चित आकडा स्पष्ट झालेला नाही. अग्नीशामक दल ही आग नेमकी कशामुळे भडकली व नेमके नुकसानी किती झाले याचा तपास करीत आहे. रात्री अकरा वाजेपर्यंत अग्नीशामक दल खबरदारी म्हणून घटनास्थळीच होते.

देवाला लावलेल्या ‘चिराग’ वर आगीचा संशय

संध्याकाळी घरात कुणी नसताना ही आग कशी लागली याबाबत निश्चित माहिती उघड झालेली नसली तरी व संपुर्ण घर आगीत खाक झाल्याने आगीच्या निश्चित कारणाचा शोध घेणे कठीण ठरलेले असले तरी घरातील महिलेने संध्याकाळच्या वेळी देवाला लावलेला दिवा आगीचे कारण ठरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दिवा लावून या घरातील  महिला या घटनेवेळी बायणातील बाझारात गेली होती. परंतु तीलाही चिराग (दिवा) वरच संशय आहे. उंदीर तो चिराग तोंडात घेऊन घरात फिरला असावा व त्यातूनच ठिणगी पडली असावी असे तीलाही वाटत आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.