|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वन-म्हावळींगे आणि सांगे मैदान आले आता सेटलमेंट झोनमध्ये

वन-म्हावळींगे आणि सांगे मैदान आले आता सेटलमेंट झोनमध्ये 

संदीप रेडकर / मडगाव

गोवा क्रिकेट संघटनेच्या मालकीच्या वन म्हावळींगे आणि सांगे येथील मैदानांवर अद्ययावत साधनसुविधांचे निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काल नगरनियोजन खात्याच्या झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत वन म्हावळींगे आणि सांगे येथील सांगे क्रिकेट अकादमीच्या जमीनीला सॅटलमेंट झोन म्हणून अखेर मान्यता मिळविण्यात आली.

नगरनियोजन खात्याच्या या निर्णयामुळे आता गोवा क्रिकेट संघटनेच्या या दोन्ही जागेवर साधनसुविधा उभारण्यासाठी संघटनेला कोणतीही अडचण राहिलेली नाही. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर हे नगरनियोजन खात्याच्या बोर्डचे सदस्य आहेत. नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सूरज लोटलीकर यांनी जीसीएची बाजू व्यवस्थिपणे मांडली व क्रिकेट खेळासाठी या मैदानांची आवश्यकता असल्याचे त्यांनी पटवून दिले. राज्यातील क्रिकेटपटूंसाठी तसेच क्रिकेट खेळाच्या विकासासाठी मंत्री विजय सरदेसाईंनी या दोन्ही जागांना सॅटलमेंट झोन म्हणून मान्यता दिली आहे.

मागील 8 वर्षे गोवा क्रिकेट संघटना वन म्हावळींगे व सांगे येथील दोन्ही जमीनी सॅटलमेंट झोनमध्ये आणण्यासाठी कार्यरत होती. मात्र अनेक कारणांसाठी त्यांचे हे प्रयत्न सफल झाले नव्हते. सूरज लोटलीकर आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रथम पेडणे तालुक्यातील धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी शासनाकडून जागा संपादीत करण्यात यशस्वी ठरले होते. आता दक्षिण व उत्तर गोव्यातील जीसीएच्या मैदानांची ही जागा सॅटलमेंट झोनमध्ये आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

वन म्हावळींगे येथील सुमारे 2 लाख 90 हजार व सांगे येथील क्रिकेट अकादमीवरील सुमारे 2 लाख 20 हजार चौरस मीटर जमीन आता सॅटलमेंट झोनमध्ये आली आहे. वन-म्हावळींगे येथील जीसीएच्या जमीनीवर हल्लीच काही जणांनी कब्जाही केला होता व तेथे खेळविण्यात येणारे सामनेही बंद केले होते. आता ही जमीन सॅटलमेंट झोनमध्ये आल्याने लवकरच जीसीए तिथे क्रिकेटपटूंसाठी आवश्यक साधनसुविधा निर्माण करणार आहे.

सध्या जीसीएकडे मैदानांचा तुटवडा आहे व यामुळे स्पर्धाही लवकरच आटपाव्या लागतात. वन-म्हावळींगे मैदान पूर्ण झाल्यानंतर ते सत्तरी तसेच डिचोलीतील क्रिकेटपटू व क्लबांसाठी एक महत्वाचे मैदान ठरणार आहे. सांगे अकादमीचे मैदाना आहेतच, मात्र सुसज्ज झाल्यानंतर कुडचडे, सांगे तसेच सालसेतच्या क्लबांना व क्रिकेटपटूंना एक आकर्षक मैदान मिळणार आहे.

पणजी जिमखानाशी गोवा क्रिकेट संघटना सामंजस्य करार करणार असून त्यामुळे तिसवाडीतील तर पर्वरी क्रिकेट अकादमी बार्देश तालुक्यातील क्रिकेटपटूंना व  क्लबांना उपयोगी ठरणार आहे. मात्र वन म्हावळींगे व सांगे मधील मैदाने शेवटी सॅटलमेंट झोनमध्ये आणण्यात जीसीए यशस्वी ठरली असली तरी या मैदानावर साधनसुविधा निर्माण करण्यासाठी जीसीएकडे आवश्यक निधी नाही. काल मुंबईत झालेल्या बैठकीतही कित्येक क्रिकेट संघटनांनी निधींचा तुटवडय़ाचा विषय काढला.

गोवा क्रिकेट संघटनेला मागील तीन वर्षे अनुदान मिळालेले नाही. क्रिकेट मैदानांच्या निर्मितीसाठी आवश्यक सर्व प्राथमिक बाबीं आता तयार असल्याचे यावेळी आपली प्रतिक्रिया देताना गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर म्हणाले. बीसीसीआयने सहकार्य दिले तर उर्वरीत सर्व बाबीं निविघ्नपणे होतील असे ते शेवटी म्हणाले.