|Sunday, June 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तुलसी गबार्ड अध्यक्षपदाच्या दावेदार

तुलसी गबार्ड अध्यक्षपदाच्या दावेदार 

अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 

अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड 2020 मध्ये होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार होऊ इच्छितात. याची अधिकृत घोषणा चालू आठवडय़ात होणार आहे. तुलसी 2013 पासून हवाई प्रांतातून प्रतिनिधिगृहावर खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. तुलसी निवडणुकीत विजयी ठरल्यास त्या पहिल्या महिला अध्यक्षा असतील. तसेच अमेरिकेच्या पहिल्या बिगरख्रिश्चन आणि पहिल्या हिंदू अध्यक्षा होण्याचा मान देखील त्यांना प्राप्त होणार आहे.

अध्यक्षीय निवडणुकीत स्वतःची उमेदवारी सादर करण्याचा निर्णय घेतला असून याची घोषणा पुढील आठवडय़ात करणार असल्याचे गबार्ड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  म्हटले आहे. अमेरिकेच्या लोकांसमोर अनेक आव्हाने असून त्याबद्दल मला चिंता असून त्यावर तोडगा काढण्यास मदत करण्याची माझी इच्छा आहे. येथे युद्ध आणि शाततेचा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे त्या म्हणाल्या.

37 वर्षीय तुलसी हवाईतून चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. दरवेळेस त्या विक्रमी मतांनी विजयी होत आल्या आहेत. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन सैन्याच्या वतीने इराकमध्ये 12 महिन्यांमध्ये सेवा बजावली आहे.

उमेदवारीची प्रक्रिया

उमेदवार होण्यासाठी तुलसी यांना प्रायमरी निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करावा लागणार आहे. याकरता त्यांना डेमोक्रेटिक पार्टीच्या किमान 12 खासदारांशी स्पर्धा करावी लागणार आहे. डेमोक्रेटिक खासदार एलिझाबेथ वॉरेन यांनी देखील अध्यक्षीय पदासाठी दावा मांडला आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस देखील दावेदारीच्या शर्यतीत आहेत. पक्षावर त्यांची तुलसी यांच्यापेक्षा अधिक पकड असल्याचे मानले जाते. कमला या ख्रिश्चन असून त्यांची आई तमिळ होती. 

कॅथॉलिक कुटुंबात जन्म

गबार्ड यांचा जन्म अमेरिकेच्या समोआमध्ये एका कॅथॉलिक कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई कॉकेशियन हिंदू आहेत. याच कारणामुळे तुलसी यांनी प्रारंभापासूनच हिंदू धर्माचे पालन केले आहे. खासदार म्हणून भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणाऱया त्या अमेरिकेतील पहिल्या नेत्या ठरल्या. अमेरिकेच्या संसदेच्या सशस्त्र सेवा समिती आणि विदेश विषयक समितीच्या त्या सदस्या आहेत. तसेच भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत व्हावेत याकरता त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.