|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कुंभपर्वा

कुंभपर्वा 

‘प्रयागराज’ येथे शनिवारपासून हिंदूंचा सर्वात मोठा आणि महत्वाचा धार्मिक सोहळा असणाऱया ‘कुंभमेळय़ा’चा शुभारंभ झाला आहे. या कुंभपर्वात सहभागी होणे, पवित्र नदीत स्नान करणे आणि साधूसंतांचे दर्शन घेणे हे पुण्यकर्म मानले गेले आहे. त्यामुळे यात प्रचंड संख्येने हिंदू भाविक समाविष्ट होतात. ही संख्या अक्षरशः कोटींच्या घरात जाते. जगातील इतर कोणत्याही धर्मामध्ये एका सोहळय़ात एकाच कालावधीत इतक्या मोठय़ा संख्येने आणि एका भावनेने भाविक जमत नाहीत, असे दिसून येते. हिंदू धर्मातील विविध जाती, जमाती, सांप्रदाय, स्त्रिया, पुरूष आणि विविध पंथांचे साधूसंत यांना समानतेने सामावून घेणारा कुंभमेळा हा म्हणूनच महत्वाचा सांस्कृतिक महोत्सव ठरतो. याचे नियोजन कोणत्याही एका मध्यवर्ती संस्थेकडून होत नाही. प्रशासनाची भूमिका यात व्यवस्थापकाची असते, हे खरे असले तरी मेळय़ाचा कालावधी व इतर कार्यक्रम अनादी काळापासून विशिष्ट वेळपत्रकानुसार पार पडत आहेत. एकहाती सूत्रसंचालन नसतानाही त्यातल्या त्यात शिस्तीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा मेळा पार पडतो, असे आजवर दिसून आले आहे. याच कारणामुळे तो एक आश्चर्यकारक सोहळा मानला जातो आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक आणि तज्ञ भारतात येतात. जगात प्रसिद्ध असलेले भारतातील जे सण किंवा उत्सव आहेत, त्यात कुंभमेळा अग्रस्थानी आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. सध्या हे पर्व सुरू झाल्याने त्याचा इतिहास आणि वर्तमान यांची माहिती देण्याचा हा संक्षिप्त प्रयत्न…

 ? कुंभमेळा केव्हापासून अस्तित्वात आला यासंबंधी अनेक कथा, आख्यायिका आणि मतमतांतरे आहेत. मात्र त्याच्या प्रारंभाची निश्चित माहिती अधिकृतरित्या नमूद केलेली नाही. हे कुंभपर्व प्राचीन काळापासून आजवर साधारणतः एकाच पद्धतीने साजरे केले जाते, एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येते.

? पुरातन काळी देव आणि दानव यांच्यात अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन झाले होते. या समुद्रमंथनातून बाहेर पडलेले अमृत देशातील चार नद्यांच्या तटावर सांडले. त्या घटनेचे स्मरण म्हणून हे पर्व या चार नद्यांच्या तटावर साजरे केले जाते. प्रत्येक नदीच्या तटावर ते प्रत्येक 12 वर्षांनंतर होते.

? कुंभ हे नाव समुद्रमंथनातून गवसलेल्या अमृत कुंभावरून प्रचलित झालेले आहे, असे एका कथेनुसार मानले जाते. तर काही जणांना मते ते कुंभ राशीनुसार साजरे केले जाते, त्यामुळे त्याचे नाव कुंभ असे पडले आहे. पुराणे आणि ऐतिहासिक ग्रथांमध्ये समुद्रमंथनाचे उल्लेख अनेकदा येतात.

? काही महत्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की कुंभमेळा इसवीसन पूर्व 525 वर्षांपासून, अर्थात अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आयोजित करण्यात येत आहे. याचे लेखी पुरावे सम्राट शिलादित्य हर्षवर्धन (इसवीसन 617 ते 647) याच्या काळातील आहेत, असे काही तज्ञ मानतात.

? काही विदेशी तज्ञांच्या मते कुंभमेळय़ाचा प्रारंभ साधारणतः 850 वर्षांपूर्वी झाला आहे. भारतात हिंदू धर्माचे पुनरूत्थान करणारे आद्य शंकराचार्य यांनी याचा प्रारंभ केला आणि इतस्ततः विखुरलेल्या व परस्परांमध्ये वैरभाव बाळगणाऱया हिंदूंना एकत्र आणण्यासाठी याचा उपयोग केल्याचेही सांगण्यात येते.

? काही विद्वानांच्या मते कुंभमेळय़ाला सुसंघटीत स्वरूप गुप्त काळात प्राप्त झाले. तोपर्यंत त्याचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने होत नव्हते. गुप्तकाळातील शीलालेखांमधून हे उल्लेख सापडतात. कुंभमेळय़ासाठी येणाऱया भाविकांच्या स्नानाची आणि निवासाची सुविधा गुप्त प्रशासन करून देत असे.

? काही ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की या पर्वाचा प्रारंभ आद्य शंकराचार्यांच्या कित्येक शतके आधी झाला आहे. पण शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य यांनी साधूसंत व भाविकांसाठी नदी संगमांवर बांधीव घाटांची व्यवस्था करून सोयी पुरविल्या.

कुंभपर्वाची स्थाने…

? कुंभपर्वाची देशात चार स्थाने आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, उत्तराखंडमधील हरिद्वार, महाराष्ट्रातील नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि मध्यप्रदेशातील उज्जैन ही ती चार स्थाने आहेत. या प्रत्येक स्थानी दर बारा वर्षांनी कुंभमेळय़ाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वेळी एकाच स्थानी हे पर्व आयोजित केले जात असल्याने तर भाविकांसाठी ही संधी दर तीन वर्षांनी उपलब्ध होते. याचाच अर्थ असा की सरासरी तीन वर्षांनी या चार स्थानांपैकी एका ठिकाणी कुंभ असतो.

? प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि गुप्त असणारी सरस्वती या नद्यांच्या संगमावर कुंभपवाचे आयोजन होते. तर हरिद्वार येथे गंगातटावर, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या तटावर आणि उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या तटावर कुंभमेळा भरतो. हिंदूंच्या कोणत्याही महत्वाच्या धार्मिक कार्यात नदीस्नान अनिवार्य कार्यक्रम असतो. त्यामुळे कुंभपर्वाचे आयोजन नदीतटावरच केले जाते. या पंरपरेला धार्मिक तसेच शास्त्रीय  आधिष्ठानही आहे अशी मांडणी अनेक तज्ञांची आहे.

? कुंभपर्वाची चार महत्वाची स्थाने वगळता अन्यत्रही त्याचे आयोजन करण्याची प्रथा आहे. यात दक्षिणेतील कुंभकोणम, हरियाणातील कुरूक्षेत्र आणि सोनेपत येथेही तर 12 वर्षांनी या मेळय़ाचे आयोजन होते. सांस्कृतिकदृष्टय़ा यांचे महत्व चार महत्वाच्या कुंभांइतकेच असले तरी भाविकांच्या दृष्टीने वरील चार स्थानांवरील कुंभमेळे अधिक महत्वाचे आहेत. या मेळय़ांना भाविकांची गर्दीही अधिक मोठय़ा प्रमाणावर असते. एकंदर, कुंभपर्वाचे महत्व अन्य धार्मिक सोहळय़ांपेक्षा जास्त आहे.

अलिकडचे काही कुंभमेळे…

? नाशिक (1980)            ? उज्जैन (1980)

? हरिद्वार (1986)           ? प्रयागराज (1989)

? नाशिक (1992)            ? उज्जैन (1992)

? हरिद्वार (1998)           ? प्रयागराज (2001)

? नाशिक (2003)            ? उज्जैन (2004)

? हरिद्वार (2010)           ? नाशिक (2015)

? हरिद्वार (2016)           ? प्रयागराज (2019)

कुंभमेळय़ातील महत्वाचे कार्यक्रम…

? पेशवाई मिरवणूक : मेळय़ात भाग घेणाऱया प्रत्येक आखाडय़ाचे साधू आणि भाविक जेव्हा कुंभस्थानी प्रवेश करतात तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले जाते. याला ‘पेशवाई’ असे म्हणतात. पेशावाई मिरवणूक नदी स्नानानंतर संपते. कोणत्या आखाडय़ाने केव्हा नदीस्नान करायचे याचा क्रम ठरलेला आहे. त्याप्रमाणेच पेशवाई मिरवणुका होतात.

? पवित्र स्नान : हा कोणत्याही कुंभमेळय़ातील सर्वात महत्वाचा धार्मिक विधी आहे. या स्नानाचेही वेळापत्रक ठरलेले असते. एका कुंभात सहा किंवा आठ प्रमुख पवित्र स्नाने असतात. त्यादिवशी नदीस्नानाची संधी मिळणे अधिक भाग्याचे मानले जाते. प्रमुख स्नानांना शाही स्नान म्हणण्याची प्रथा आहे. आखाडय़ांचे प्रमुख या शाही स्नानांमध्ये आपल्या अनुयायांसह भाग घेतात.

? धार्मिक प्रवचने : कुंभमेळय़ात भाग घेणाऱया विविध साधूंची आणि धर्मतज्ञांची प्रवचने हा अखंड चालणारा महत्वाचा कार्यक्रम असतो. यावेळी धार्मिक विषयांवर चर्चासत्रेही होतात. देशाच्या विविध भागांमधून आलेले विद्वान यात भाग घेऊन आपल्या विद्वत्तेचे दर्शन घडवितात. त्यामुळे या कार्यक्रमाला सामाजिक महत्व आहे. समाज संघटन हा यामागचा हेतू सांगितला जातो.

दर्शन : कुंभमेळय़ाला आलेल्या भाविकांनी एकमेकांची भेट घेणे आणि एकमेकांची सन्मानपूर्वक विचारपूस करणे याला दर्शन असे म्हणतात. हा सुद्धा महत्वाचा आणि सामाजिक आशय असणारा कार्यक्रम आहे. कुंभमेळय़ात साधू आणि सर्वसामान्य लोक अशा दोन प्रकारचे भाविक समाविष्ट होतात. त्यांचा एकमेकांशी परिचय होणे हे दर्शनाचे प्रमुख उद्दिष्टय़ आहे.

महाप्रसाद : भारताच्या विविध प्रांतांमधील वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ तयार करून भक्तांना वितरीत करणे, अन्नछत्रांमधून भाविकांची क्षुधातृप्ती करणे, आदी कार्यक्रमांना महाप्रसाद असे संबोधले जाते. सर्व भाविक कोणताही भेदभाव न बाळगता महाप्रसादाचा आनंद घेतात. कुंभमेळय़ातील सहभागाची पुण्यप्राप्ती महाप्रसाद घेतल्याशिवाय होत नाही, अशी श्रद्धा आहे.

आखाडय़ांची भूमिका…

उत्तर भारतात साधूंच्या मठांना आखाडा असे संबोधतात. असे असंख्य आखाडे उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, ईशान्य भारत आदी भागांभध्ये आहेत. या आखाडय़ांचे साधू आणि अनुयायी यांची संख्या प्रचंड आहे. त्यांची कुंभ मेळय़ातील भूमिका महत्वाची असते. मुस्लीम शासकांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांमुळे आखाडय़ांच्या माध्यमातून एकत्र येण्याची आणि बलोपासना करण्याची प्रथा सुरू झाली, असे अनेक तज्ञांनी म्हटले आहे. कुंभमेळय़ांमधील प्रमुख उपस्थिती याच आखाडय़ांच्या साधूंची आणि अनुयायांची असते. अनेक अखाडय़ांच्या प्रमुखांना  कुंभमेळय़ामध्ये आदराची स्थाने दिली जातात. कुंभमेळय़ाचे व्यवस्थापनही गेली अनेक शतके या आखाडय़ांकडून केले जात आहे. कुंभपर्वात ईशान्य भारतातून येणारे नागा साधू आणि त्यांचे अनुयायी हा औत्सुक्याचा विषय असतो. भारताच्या जवळपास सर्व भागांमधील साधू संत, धर्मतज्ञ आणि धार्मिक संस्था यांची कुंभपर्वात महत्वाची भूमिका असते.

कालावधी…

? हिंदू कालगणनेनुसार कुंभपर्वाचा विविध स्थानांचा कालावधी निर्धारित केला जातो. विविध राशींमधील सूर्य आणि इतर ग्रहांच्या स्थानानुसार ही वेळ ठरविली जाते. ही कालगणना निश्चित असून तिच्यात शतकानुशके कोणतेही परिवर्तन झालेले नाही. चार स्थानांवरील कुंभपर्वाचा कालावधी पुढीप्रमाणे आहे.

? हरिद्वार आणि नाशिक येथील कुंभमेळय़ांमध्ये साधारतः 3 वर्षांचे अंतर असते. तर नाशिक आणि उज्जैन येथील मेळय़ांमध्ये 1 वर्षाचे अंतर असते. प्रयागराज आणि हरिद्वार येथे दर सहा वर्षांनी एक अर्धकुंभ मेळय़ाचे आयोजन करण्यात येते तर 12 वर्षांनी महाकुंभ मेळय़ाचे आयोजन होते.

? नाशिक आणि उज्जैन येथील कुंभमेळा गुरू, सूर्य किंवा चंद्र सिंह राशीत असताना आयोजित केला जातो. त्यामुळे त्याला सिंहस्थ कुंभ म्हणतात. प्रयागराज येथील कुंभ मेळा सूर्य आणि चंद्र माघ महिन्याच्या अमावस्येला मकर राशीत असताना आयोजित केला जातो. विक्रम संवत पंचागानुसार ही तिथी ठरते.

? हरिद्वार येथील कुंभमेळा ‘मूळ’चा मानला जातो कारण तो कुंभ राशीतील सूर्य आणि चंद्राच्या प्रवेशानुसार निर्धारित केला जातो. हरिद्वार येथील कुंभमेळय़ाचे उल्लेख अनेक विदेशी इतिहासकारांनी आणि प्रवाशांनीसुद्धा त्यांच्या भारतवर्णनात करून ठेवल्याचे आढळते. असे प्रथम वर्णन इसवीसन 1695 मधील आढळते.

? चार कुंभमेळय़ांपैकी सर्वात पुरातन हरिद्वारचा कुंभमेळा मानला जातो. तर मध्यप्रदेशातील उज्जैन येथील कुंभपर्व सर्वात अलिकडचे मानले जाते. हिंदू सत्ताधीश राणोजी शिंदे यांनी नाशिकहून काही साधूंना आमंत्रित करून 18 व्या शतकात या कुंभाचा प्रारंभ केल्याचे सांगितले जाते. पण यावर तज्ञांचे दुमत आहे.