|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » साहित्य संमेलनात गर्दीचा पूर

साहित्य संमेलनात गर्दीचा पूर 

सुकृत मोकाशी/ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ

अनेकविध वादविवादांमुळे यशस्वितेविषयीच्या शंकाकुशंकांनी वेढलेल्या यवतमाळमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी गर्दीचा महापूर अनुभवायला मिळाला. परिसंवाद, ग्रंथप्रदर्शन, कविसंमेलनासह सर्वच कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देत रसिकजनांनी संमेलनात ऊर्जा आणली.

यवतमाळ हा जिल्हा शेतकऱयांच्या दृष्टीने संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळी भाग असल्याने शेतकऱयांच्या आत्महत्या येथे मोठया प्रमाणावर होत असतात. तरीदेखील यवतमाळ येथे होणाऱया सारस्वतांच्या या मेळय़ाला यवतमाळकरांसह राज्याच्या इतर भागातूनही रसिकांनी हजेरी लावली. ग्रामीण भागात तशी कमी संमेलने होत असतात. त्यामुळे अनेक वर्षांनंतर होणाऱया यवतमाळ संमेलनातील कार्यक्रमांचा रसिकांनी मनापासून आस्वाद घेतला.

शुक्रवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनच्या कार्यक्रमापासूनच रसिकांनी संमेलनाला गर्दी करायला सुरुवात केली. शनिवारी दुपारनंतर हा ओघ अधिक वाढला. विविध विषयांवरील परिसंवाद, कविकट्टा, प्रकाशन मंचावरील कार्यक्रमांना रसिक उदंड प्रतिसाद देत आहेत. कविकट्टयावरही कविता ऐकण्यासाठी कानसेन गर्दी करत आहेत. स्थानिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने भेटी देताना दिसत आहेत.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शाळेतील प्रशिक भारत हा विद्यार्थी म्हणाला, साहित्य संमेलनाला येऊन साहित्याविषयी असलेली गोडी वाढते. साहित्य म्हणजे काय याची माहिती मिळते. येथील ग्रंथप्रदर्शनामुळे विविध पुस्तकांची माहिती मिळाली. प्रत्येक साहित्य संमेलनाला जावेसे वाटत आहे. येथे आल्याने साहित्यिकांची माहिती मिळते.

साहित्य असेल, तरच सर्व काही आहे

एस.पी. चौधरी म्हणाले, माझे हे दुसरे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी चंद्रपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाला गेलो होतो. हा भाग थोडा मागास असल्याने या भागामध्ये साहित्य संमेलने कमी होतात. दुर्वास वाघमारे म्हणाले, जीवनात साहित्याशिवाय काय आहे. साहित्य असेल, तर सगळे आहे. पुस्तके वाचल्याने आपल्यातली अंधश्रद्धा निघून जाते. पुस्तके वाचायला मला आवडतात. आता ग्रंथप्रदर्शनातून पुस्तके घायची आहेत.