|Sunday, June 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सवर्ण आरक्षणासाठी ‘हे’ दस्तऐवज आवश्यक!

सवर्ण आरक्षणासाठी ‘हे’ दस्तऐवज आवश्यक! 

नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सवर्ण वर्गासाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने मोठी खेळी केली आहे. सामान्य वर्गाला मिळणाऱया या 10 टक्के आरक्षणाचा फायदा खुप लोकांना मिळणार आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सवर्ण आरक्षण मिळविण्यासाठी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, बीपीएल कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, प्राप्तीकर परतावा, बँके खाते आणि बँक खाते उतारा या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.

उत्पन्न दाखला

सरकारने या आरक्षणासाठी उत्पन्न दाखल्याची अट लागू गेली आहे. 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱया सामान्य वर्गातील लोकांचा या आरक्षणात समावेश आहे. त्यासाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला आपल्याकडे आवश्यक आहे. जर हा दाखला उपलब्ध नसेल तर तहसील किंवा जनसेवा केंद्राकडून प्राप्त करून घेता येईल त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.

जातीचा दाखला

सामान्य वर्गाच्या आरक्षणासाठी आपण सामान्य वर्गातील आहात यासाठी आपल्याकडे त्याप्रकारच्या जातीचा दाखला आवश्यक आहे. जर आपल्याकडे तो दाखला उपलब्ध नसेल तर तो तहसील किंवा जनसेवा केंद्राकडून प्राप्त करून घेणे गरजेचे आहे.

बीपीएल कार्ड

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपण मागासवर्गीय गटात आहात हे सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे बीपीएल कार्ड असणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे बीपीएल कार्ड नसेल तर आपण मागासवर्गीय गटात मोडत नाही असे समजण्यात येऊन आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

पॅन कार्ड

सध्या सर्वप्रकारच्या नोकऱया आणि सेवांमध्ये पॅनकार्ड अनिवार्य आहे. जर आपल्याकडे पॅन कार्ड नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

आधार कार्ड

आरक्षणाच्या लाभासाठी आधार कार्डची असणे गरजेचे आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीचा पुरावा असून आधार कार्डच्या आधारे आपली पूर्ण माहिती उपलब्ध होते. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर सवर्ण आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

प्राप्तिकर परतावा

आपल्याला सामान्य वर्गाच्या आरक्षणासाठी प्राप्तिकर परताव्याची कागदपत्रे द्यायला लागणार आहेत. या कागदपत्राबरोबर त्याचे पुरावेही द्यावे लागणार की, आपले उत्पन्न 8 लाखांपेक्षाही कमी आहे.

बँक खाते आणि खाते उतारा

मोदी सरकारने सुरुवातीलाच जनधन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत देशभरातील लाखोंच्यावर बँक खाती काढण्यात आली आहेत. सरकारच्या मते प्रत्येक व्यक्तिचे बँक खाते असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे बँक खाते नसेल तर ते लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपल्याला 3 महिन्याचा बँक खाते उतारा द्यावा लागणार आहे.