|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जवाहर, दत्त व गुरुदत्त या तिन्ही साखर कारखान्यांचे विभागिय कार्यालये फोडले

जवाहर, दत्त व गुरुदत्त या तिन्ही साखर कारखान्यांचे विभागिय कार्यालये फोडले 

जयसिंगपूर  / प्रतिनिधी

एफआरपीचे तुकडे करुन पहिली उचल 2300 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर शहरातील जवाहर,

दत्त व गुरुदत्त या तिन्ही साखर कारखान्यांचे विभागिय कार्यालये फोडले.

शनिवारी रात्रीपर्यंत ऊस तोडी बंद ठेवून रविवारी सायंकाळी पासून ऊस

वाहतुकीची वाहने रस्त्यावर फिरु देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे एफआरपीच्या मुद्यावर शिरोळ

तालुक्यात पुन्हा आंदोलन पेटले आहे.

गेल्या तीन महिन्यापासून एकरक्कमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी

कोल्हापूर, सांगलीसह, देशपातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा

लढा सुरु केला होता. या प्रश्नी खा.शेट्टी यांच्या निवासस्थानी तसेच साखर

सहसंचालक कार्यालयात बैठका होवूनही कोणताच एफआरपीचा तोडगा निघाला नव्हता,

दरम्यान, शुक्रवारी साखर कारखान्याने एकरक्कमी एफआरपीचे तुकडे करुन पहिली

उचल 2300 रुपये शेतकयांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. यावर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेवून शनिवारी सकाळी कुरुंदवाड

शहरातील जवाहर, गुरुदत्त, दत्त, पंचगंगा, शरद, बेडकिहाळ, दत्त इंडिया या

साखर कारखान्याची विभागिय कार्यालयांना टाळे ठोकून शासन व कारखानदारांचा

निषेध केला.

दरम्यान, दुपारी 2 च्या सुमारास जयसिंगपूर येथील स्वाभिमानीच्या

कार्यालयात कार्यकर्ते एकत्र येवून जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकार

मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदार व शासनाचा धिक्कार असो अशा

घोषणा देत शरद साखर कारखान्याच्या विभागिय कार्यालयात जावून

कर्मचायांना कार्यालये बंद ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर पंचगंगा

विभागिय कार्यालयाचे गेट मोडून कार्यालयाच्या दरवाजावर जोपर्यंत एकरक्कमी

एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडायचे नाही. अशी नोटीस दरवाजावर

लावण्यात आली आहे.

आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा सांगली-कोल्हापूर

महामार्गावर असलेल्या जवाहर कारखान्याच्या विभागिय कार्यालयात जावून

कर्मचायांना कार्यालय बंद करण्यास सांगितले. व कर्मचायांना बाहेर

काढून कार्यालयातील खुर्च्या, टेबल, खिडक्या, कपाटे अशा सर्व साहित्याची

नासधुस करुन आंदोलन केले. त्यानंतर लक्ष्मी रोडवरील असलेल्या श्री दत्त

साखर कारखान्याचे असलेले विभागीय कार्यालयामधील खुर्च्या, टेबल, कपाटे

यासह सर्व साहित्य फोडून कार्यरलयाला टाळे ठोकले. त्यानंतर आंदोलकांनी

शिरोळ मार्गावर असलेले गुरुदत्त च्या विभागीय कार्यालय हे बंद असल्याने

कार्यकर्त्यांनी गेट व दरवाजा मोडून कपाटे खुर्च्या, संगणक यासह उर्वरित

साहित्याची मोडतोड केली.

गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेल्या एकरकमी एफआरपीचा तोडगा 2300 रुपये

काढल्याने अखेर शिरोळ तालुक्यात आंदोलनाची ठिणगी उडली. त्यामुळे

स्वाभिमानीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व विभागीय

कार्यालये बंद करुन अनेक कार्यरलये फोडले.

पंचगंगा कार्यालयाला नोटीस लावताना सागर चिप्परगे, सागर शंभुशेट्टे,

शैलेश आडके, सचिन शिंदे, विवेक पाटील, शैलेश चौगुले, आशिष समगे, ऋतुराज

सावंत देसाई, सागर मादनाईक, राम शिंदे, महंमद नदाफ, पंकज मगदूम, बंडू

पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.