|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मजरेवाडीत डोक्यात भरणी घालून भावाचा खून

मजरेवाडीत डोक्यात भरणी घालून भावाचा खून 

प्रतिनिधी/ सोलापूर

 शहरातील मजरेवाडी भागातील बेघर वसाहतीत दोन भावांमध्ये होणाऱया नेहमीच्या भांडणात नेहमीच मार खाणाऱया व त्यामुळे त्रासलेल्या एका भावाने दुसऱया भावाच्या डोक्यात चिनीमातीची भरणी घालून खून केल्याची घटना काल शुक्रवारी रात्री घडली. संतोष किसन सावंत (वय 35, रा. बेघर वसाहत, मजरेवाडी, सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर नंदकुमार किसन सावंत (वय 30, रा. बेघर वसाहत, मजरेवाडी, सोलापूर) असे खून करणाऱयाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष आणि नंदकुमार हे दोघे सख्खे भाऊ. दोघेही बेकार होते. त्यातच त्या दोघांनाही दारुचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच वादावादी व भांडणे होत होती. त्या दोघांच्या भांडणाकडे कोणीही लक्ष देत नसत. त्यातच शुक्रवारी रात्री नंदकुमार आणि संतोष यांच्यात मोठय़ाने भांडण झाले. त्यावेळी संतोष याने नंदकुमार यास मारहाण केली. नेहमीच भावाकडून होणाऱया मारहाणीला वैतागलेल्या नंदकुमारने जवळच पडलेली बरणी उचलून संतोषच्या डोक्यात जोराने मारली. यामुळे मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो गंभीर जखमी झाला होता.

जखमी संतोषला रात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. परंतु, उपचारापूर्वीच संतोष मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या गुह्यची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Related posts: