|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बोलकी शौचालय स्पर्धेत जिल्हा अव्वल

बोलकी शौचालय स्पर्धेत जिल्हा अव्वल 

प्रतिनिधी/ सातारा

राज्य शासनानेच स्वच्छतेची चळवळ आणखी गतीमान करण्यासाठी प्रबोधनात्मक म्हणून बोलकी शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सातारा जिह्यातील 1501 ग्रामपंचायतींना तशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारीपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत केवळ दहा दिवसांमध्ये सातारा जिल्हा राज्यात रँकींगमध्ये अग्रेसर आहे. जिह्यात 874 ग्रामपंचायतींनी सार्वजनिक शौचालये रंगवून त्यावर प्रबोधनात्मक वाक्ये लिहून सज्ज झाली आहेत.

सातारा जिह्याने स्वच्छतेमध्ये देश पातळीवर डंका मिरवला आहे. तेवढय़ावर गप्प न बसता स्वच्छता ही अवितरपणे चालणारी प्रक्रिया आहे, यामुळेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ग्रामपंचायतींना सातत्याने रिचार्ज करत आहेत. नुकतेच शासनाने बोलकी शौचालये ही स्पर्धा जाहीर केली आहे. ही स्पर्धा 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान चालणार आहे. त्याबाबत या स्पर्धेत सर्वच गावांनी सहभागी होण्याबाबत सूचना काढताच स्वच्छता व पाणी पुरवठय़ाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सायमोते यांनी ही त्याची लगेच अंमलबजावणी केली. त्यामुळे सातारा जिह्यात बोलकी शौचालये या स्पर्धेत उतरण्यासाठी सर्वच गावे तयार झाली आहेत. तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर बक्षिसे गावांना देण्यात येणार आहेत.

त्यामध्ये सातारा जिह्यात गेल्या दहा दिवसांत 1501 ग्रामपंचायतीपैकी 11 ब्लॉकमध्ये 817 ग्रामपंचायतीमध्ये 874 गावांमध्ये 11 हजार 623 शौचालये रंगवून बोलकी केली आहेत आणि राज्यात सध्या रँकींगमध्येही अग्रेसर आहे. या उपक्रमामुळे राज्यभर स्वच्छतेचा संदेश पाहोचणार आहे.