|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सागरी संपत्तीवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करणार!

सागरी संपत्तीवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करणार! 

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची ग्वाही 

ओझर विद्यामंदिरतर्फे नागरी सत्कार 

वेंगुर्ल्यात होणार मुंबई विद्यापीठाचे सागरी संशोधन केंद्र! पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

डॉ. पेडणेकर भविष्यात राज्यसभेवर दिसतील!

खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / मालवण:

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा नागरी सत्कार मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर, कांदळगावतर्फे प्रशालेच्या सभागृहात रविवारी झाला. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रतिकूल परिस्थितीत डॉ. पेडणेकर यांनी मिळविलेले यश आणि आज ऐतिहासीक परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत होणे ही सिंधुदुर्गवासीयांसाठी भाग्यकारक घटना आहे, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉ. पेडणेकर यांनी शैक्षणिक सेवा जीवनातील सर्वोच्च पदापर्यंत घेतलेली झेप हे सर्वांसाठी भूषणावह आहे. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण हडी गावात झाले. एसएससीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण ओझर विद्यामंदिर, कांदळगाव शाळेत झाले. त्यामुळे त्यांचा नागरी सत्कार करण्याचे ठरले, असे प्रास्ताविकात ओझर विद्यामंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब यांनी स्पष्ट केले.

उद्योजक डॉ. श्रीकृष्ण परब, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती सोनाली कोदे, उद्योजक मंगेश सुर्वे, सहय़ाद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर खापणे, मुख्याध्यापक पी. आर. खोत, भाई गोवेकर, हरी खोबरेकर, बबन शिंदे, कांदळगाव सरपंच उमदी परब, उपसरपंच रणजीत परब, संस्थाध्यक्ष ना. ग. राणे, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरंग मंडले, मालवण तहसीलदार समीर घारे, हडी सरपंच महेश मांजरेकर, बेस्ट हनुमान ट्रस्टचे नंदकुमार राणे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते. सौ. स्नेहल मिठबावकर, कौस्तुभ मिठबावकर, सोनाली कोदे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

झाराप उपकेंद्राला चालना मिळावी!

खासदार राऊत म्हणाले, महाविद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर पेडणेकर लाखो विद्यार्थ्यांचे गुरू बनले आहेत. त्यांची नम्रता, विनयता, शिक्षकांबद्दलचा आदरभाव, नातेवाईकांचा आदर, आत्मियता पाहिल्यानंतर ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ याची प्रचिती येते. कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जिल्हय़ात निर्माण झालं हे आमचं सर्वांचं भाग्य आहे. झाराप येथील 25 एकर जमिनीवर उपकेंद्राला पुढील चालना डॉ. पेडणेकर यांच्या कालावधीत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच डॉ. पेडणेकर यांचा सन्मान राज्यसभेत जाऊन होईल आणि तेथे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिसून येईल, असेही ते म्हणाले.

हडी गावचे भाग्य थोर!

पालकमत्री केसरकर म्हणाले, हडी गावाचे मोठे भाग्य आहे, की सुहास पेडणेकर या गावचे सुपुत्र आहेत. जिल्हावासीयांबद्दल मोठी आत्मियता त्यांना आहे. या सुपुत्राचा संपूर्ण राज्याला अभिमान आहे. कुलगुरू होण्यासाठी प्रचंड गुणवत्ता आवश्यक असते. सागरी संशोधन केंद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले येथे होत आहे. आपला माणूस मोठा होताना आपल्या मातीला विसरत नाही, याची प्रचिती यातून येत आहे. आमदार नाईक यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.

कौशल्य विकास शिक्षणाची आवश्यकता!

मुंबई विद्यापीठाला 720 किमीची सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला भाग आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षणाची आवश्यकता आहे. यंत्र मानवामुळे आज युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातर्फे वेंगुर्ले येथे किनारपट्टीवरील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सोमवारी पाहणी करण्यात येणार आहे. सागरी संपत्तीचा उपयोग करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कौशल्य शिक्षणाची खरी गरज आता आहे. केवळ मुलांनी नोकरीसाठी तयार न होता, इतरांसाठी नोकरी तयार करणारे बनणे गरजेचे असल्याचे सत्काराला उत्तर देताना डॉ. पेडणेकर म्हणाले. सुत्रसंचालन डी. डी. जाधव व ऋषी देसाई यांनी, आभार पी. आर. खोत यांनी मानले.

यश भावंडांना समर्पित!

आजवरच्या प्रवासात मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ बंधू रामदास, वहिनी तसेच आई-वडील, अन्य भाऊ, बहीण, पत्नी यांचा सहभाग मोठा आहे. या यशात भावंडांची प्रेरणा मोठी आहे. कुणासमोर ‘हात पसरण्यापेक्षा त्या हातानी कष्ट करून मिळव’ ही आईची शिकवण आयुष्यात उपयोगी ठरली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. मी शिकावं, यासाठी कष्ट करून कुटुंब सावरलेल्या सर्वांचा मी ऋणी राहीन. कुलगुरुपदी निवड होणं हा मोठा सन्मान आहे. मुंबई विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.