|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापुरुषांच्या वेशभूषेमुळे ग्रंथदिंडी लक्षवेधी

महापुरुषांच्या वेशभूषेमुळे ग्रंथदिंडी लक्षवेधी 

वार्ताहर/ कडोली

ढोल-ताशा, लेझीम आणि टिपऱयांचा मन भारावून टाकणारा दरवळ, संतांच्या मुखातून उमटणारा भजनाचा गजर आणि भारतीय संस्कृतीला योगदान देणाऱया थोर पुरुषांच्या विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने कडोली मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली.

गावच्या वेशीत श्रीराम सोसायटीजवळ रविवारी सकाळी 9.30 वाजता हभप लक्ष्मण मारुती बुवा यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध कलापथके यात सहभागी झाली होती. प्राथमिक मराठी शाळेच्यावतीने राजमाता जिजाऊ, सईबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, सिंधुताई सपकाळ, महात्मा फुले आदी थोर पुरुषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी ग्रंथदिंडीत लक्ष वेधून घेत होते. हंदिगनूर येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. कलमेश्वर भजनी मंडळ आणि कलमेश्वर वारकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या विठू नामाच्या गजराने ग्रंथदिंडी न्हाऊन निघाली होती. ग्रंथदिंडीत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी हाती घेतलेले विविध संदेश देणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

शिवमुद्रा ढोल-ताशा पथक सर्वांचे आकर्षण होते. प्राथमिक मराठी शाळेच्या मुलांच्या लेझीम आणि टिपरीने ग्रंथदिंडीत रंगत आणली होती. गंथदिंडीच्या मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळय़ा काढल्या होत्या. स्वागत फलकांनी दिंडीमार्ग फुलून गेला होता.

या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शेषराव मोहिते, व्याख्याते प्रा. बालाजी गाढे-पाटील, कवी सतीश राऊत, चंद्रकांत पोतदार, शरदराव सावंत, बसवंत शहापूरकर, शिवाजी शिंदे, सु. ना. गावडे, संजय साबळे, कथाकार हिंमत पाटील, अशोक दानवडे, टोपाण्णा पाटील, शरद शिवाजी पाटील, भैरवनाथ पाटील, बी. डी. मोहनगेकर, प्रमिला विश्वनाथ पाटील, अर्चना हेमंत कोलेकर, श्रीनिवास कालकुंद्रीकर, ऍड. शाम पाटील, राजू मायाण्णा, बाबुराव गौंडाडकर, बाबुराव नेसरकर, भरतकुमार भोसले, निळूभाऊ नार्वेकर, कडोली मराठी साहित्य संघाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

उद्घाटन सोहळा

ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर महिला मंडळाच्या सुवासिनींनी सर्व साहित्यिकांचे कुंकुमतिलक लावून आणि आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर ग्रंथदालनाचे उद्घाटन हंदिगनूर ग्रा. पं. उपाध्यक्ष भैरवनाथ पाटील यांच्या हस्ते, कै. नागुबाई आप्पाण्णा पाटील स्मृतिसंमेलन मंडपाचे उद्घाटन उद्योगपती टोपाण्णा पाटील यांच्या हस्ते, शिवप्रतिमा पूजन बेळगाव तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष बी. डी. मोहनगेकर यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन साई सन्मित्र सोसायटीच्या संचालिका प्रमिला विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते, सरस्वती प्रतिमा पूजन अर्चना हेमंत कोलेकर यांच्या हस्ते, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन इंजिनियर श्रीनिवास कालकुंद्रीकर यांच्या हस्ते, म. जोतिबा फुले प्रतिमा पूजन ऍड. शाम पाटील यांच्या हस्ते, कै. प्रा. तुकाराम पाटील प्रतिमा पूजन ग्रा. पं. अध्यक्ष राजू मायाण्णा यांच्या हस्ते करण्यात आले. सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन सांगाती पतसंस्थेचे चेअरमन उद्योजक शरद पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर जैन इंजिनिअरिंग ऑटोनगर बेळगावचे उद्योजक अशोक दानवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.

उद्घाटनानंतर कडोली येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे ईशस्तवन आणि स्वागतगीत झाले. कडोली मराठी संघाच्यावतीने मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कडोली मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर यांनी प्रास्ताविकात कडोलीत होत असलेल्या साहित्य संमेलनांचे फलित आणि गावचे योगदान काय आहे, मराठी भाषेचे संवर्धन करण्यास संमेलनाचे आयोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. स्वागताध्यक्ष सुधीर कुट्रे यांनी व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक, साहित्यिकांचे स्वागत करून कडोली मराठी साहित्य संमेलनांतून थोर साहित्यिकांविषयी आम्हाला ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले याबाबत आम्ही स्वत:ला धन्य मानतो, हेच आमचे फलित आहे, असे सांगितले.