|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनमोड-गोवा महामार्ग आजपासून चारचाकी वाहनांसाठी खुला

अनमोड-गोवा महामार्ग आजपासून चारचाकी वाहनांसाठी खुला 

वार्ताहर/ रामनगर

कर्नाटक हद्दीतून गोवा राज्यामध्ये जाणारा अनमोड मार्ग चारचाकी वाहनांसाठी मंगळवार दि. 15 पासून दिवस-रात्र खुला करण्यात येणार आहे. मात्र काही दिवसच हा रस्ता फक्त दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

चार दिवसांपूर्वी या मार्गावर कर्नाटकाच्या हद्दीत मातीचे ढिगारे टाकून हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला होता. परंतु मंगळवारी सकाळी 10 वाजता मातीचे ढिगारे बाजूला हटवून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग पूर्णतः खुला करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप बिलकॉन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर शर्मा यांनी तरुण भारत प्रतिनिधीला दिली. मंगळवारपासून तिनईघाट येथून अनमोडपर्यंत रस्ता पूर्णतः दोन्ही बाजूंनी मातीचे ढिगारे घालून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनमोड येथून आखेती, मारसंगळ, तिनईघाट यामार्गे प्रवास करावा लागणार आहे. यामुळे वाहनधारकांना 5 कि. मी. अधिकचा प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा अनमोड, कॅसलरॉक, चांदेवाडी, रामनगर असा 10 कि. मी. अधिक प्रवास करावा लागणार आहे. यामुळे या मार्गाचा अवलंब या भागातील शाळाबस व इतर वाहनधारकांनी करावा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.

या भागातील रस्ते आणि ब्रिज झाल्यानंतर लगेचच गोवा हद्दीतील रस्त्याचे काम करण्यात येणार असून दोन दिवस आधी रस्ता बंद करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी मात्र नागरिकांनी कंपनीला सहकार्य करण्याची गरज आहे. त्याचबरोबर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांनी सावकाश जाणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

सदर निर्णयामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच या मार्गावरील हॉटेलचालकांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे. गोवा राज्यातील मोले येथूनही  रस्ता बंद करण्यास विरोध होता. मात्र आता रस्ता खुला होणार असल्याने व्यावसायिकांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Related posts: