|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » क्रिडा » हॉकी इंडिया निवड समितीत सरदार सिंगचा समावेश

हॉकी इंडिया निवड समितीत सरदार सिंगचा समावेश 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा माजी हॉकी कर्णधार सरदार सिंगवर आता नवी जबाबदारी टाकण्यात आली असून 13 सदस्यीय हॉकी इंडिया निवड समितीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. 1975 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या हॉकी संघाचा कर्णधार बीपी गोविंदा हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

सरदार सिंगला 2020 च्या ऑलिम्पिकपर्यंत खेळायचे होते. पण गेल्या वर्षीच्या आशियाई स्पर्धेत संघाची निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर त्याला निवृत्तीचा निर्णय घेणे भाग पडले होते. निवड समितीत त्याची निवड झाल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला आहे. ‘मला ऑफर देण्यात आली होती आणि मी ती स्वीकारली आहे. माझ्यासाठी हे नवे आव्हान असून भारतीय हॉकीची कोणत्या ना कोणत्या मार्गाने सेवा करण्यास मी उत्सुक आहे,’ अशी प्रतिक्रिया सरदार सिंगने दिली आहे. या निवड समितीत हरबिंदर सिंग, सईद अली, एबी सुब्बय्या, आरपी सिंग, रजनीश मिश्रा, जॉयदीप कौर, सुरेंदर कौर, असुंता लाक्रा, हाय परफॉर्मन्स डायरेक्टर डेव्हिड जॉन, महिला व पुरुष वरि÷ संघांचे प्रशिक्षक यांचाही समावेश आहे. निवृत्तीनंतर सरदार सिंग अनेक कामांत गुंतला असून हरियाणात तो अकादमी सुरू करणार आहे व एका एनजीओसाठीही काम करीत आहे. याशिवाय त्याला युरोपियन लीगमध्ये खेळण्याच्या ऑफर्सही येत असल्याचे त्याने सांगितले.