|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कोणत्याही परिस्थितीत जमीन बळकावू देणार नाही

कोणत्याही परिस्थितीत जमीन बळकावू देणार नाही 

भू संपादन विरोधात बेळगुंदीमधील बैठकीत निर्धारः

वार्ताहर/ किणये

रिंगरोड भूसंपादनाला बेळगुंदी भागातील शेतकऱयांनी आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱयांची बुधवारी सायंकाळी बेळगुंदी येथील मरगाई देवस्थानच्या परिसरात बैठक घेण्यात आली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा निर्धार करण्यात आला असून शनिवारी भूसंपादनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱयांच्या पिकाऊ जमिनी हडप करण्याचा प्रशासनाने घाट रचला आहे. आपली जमीन, माती वाचवायची असेल तर आता आवाज उठविलाच पाहिजे. प्रत्येक गावातून संघटितपणे लढा उभारून प्रशासनाचा कुटिल डाव हाणून पाडू, असे मनोगत ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांनी व्यक्त केले.

या भागातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. काही जणांची तर अगदी जेमतेम शेती आहे. जर रिंगरोडसाठी जमीन गेली तर कित्येक कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. यासाठी आमच्या जमिनी वाचविण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे यल्लाप्पा ढेकोळकर यांनी सांगितले.

विकासाच्या नावावर भूसंपादन करणे, हेच सरकारचे धोरण आहे. इथली जमीन हे आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. तेच घेण्याचा प्रयत्न झाला तर शेतकऱयांनी जायचे कुठे? असा सवाल प्रल्हाद चिरमुरकर यांनी उपस्थित केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर चौगुले, पुंडलिक जाधव, ऍड. नामदेव मोरे, आनंद माळी, महादेव पाऊसकर, रवळू शहापूरकर, भरमू पाऊसकर, आर. कांबळे आदींची भाषणे झाली.

यल्लाप्पा बेळगावकर, रामचंद्र पाटील, गणपत बेळगावकर, म्हात्रू फगरे, कृष्णा बाचीकर, रवि हलकर्णीकर, मेहबूब मुजावर, शंकर कुन्नूरकर, पुंडलिक गावडा, नामदेव गुरव, लक्ष्मण कदम, कृष्णा शहापूरकर, शट्टूप्पा पाटील, राजू किणयेकर, जयवंत पाटील, मारुती गावडा आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.