|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » आवनवोल प्रतिष्ठानचा कविवर्य द.भा. धामणस्कर काव्य पुरस्कार अविनाश गायकवाडना यांना जाहीर

आवनवोल प्रतिष्ठानचा कविवर्य द.भा. धामणस्कर काव्य पुरस्कार अविनाश गायकवाडना यांना जाहीर 

ऑनलाईन टीम / कणकवली :

आवानओल प्रतिष्ठान कणकवलीतर्फे देण्यात येणारा 2018 सालचा कविवर्य द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार ठाणे येथील कवी अविनाश गायकवाड यांना त्यांच्या पेपरऑल मीडिया ऍण्ड पब्लिकेशनने (मुंबई) प्रकाशित केलेल्या ‘खिंडित गोठलेलं सुख’ या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे.

कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी साहित्यातील नव्या जाणिवांच्या कवींसाठी गेली नऊ वर्षे कार्यरत असलेल्या आवानओल प्रतिष्ठानतर्फे साहित्य चळवळ राबविण्यात येते. याचाच एक भाग म्हणजे कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आजतागायत मराठीतील कवितासंग्रह अप्रकाशित असलेल्या एका उत्कृष्ट कवीला धामणस्कर काव्य पुरस्काराने गौरविण्यात येत होते. मात्र, यावर्षीपासून हा पुरस्कार मागील दोन वर्षातील प्रकाशित झालेल्या एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे. क्वचितप्रसंगी कविता अप्रकाशित असणाऱया एका गुणवान कवीलाही तो देण्यात येईल. या नव्या बदलानुसार या पहिल्या पुरस्कारासाठी कवी गायकवाड यांच्या ‘खिंडित गोठलेलं सुख’ या काव्यसंग्र्रहाची निवड करण्यात आली आहे. कणकवली येथे 26 जानेवारी रोजी होणाऱया नवव्या उगवाई काव्योत्सवात गायकवाड यांना पुरस्काराने मराठीतील मान्यवर कवीच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

गायकवाड हे अनेक वर्ष निष्ठेने कवितालेखन करीत आहेत. कवितेकडे गांभिर्याने बघणाऱया या कवीने चांगली मराठी कविता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावी म्हणून उपक्रम राबविले. मात्र, स्वतःची कविता प्रसिद्धीपासून दूर ठेवली. त्यामुळेच त्यांच्या कवितेची गुणवत्ता चांगल्या वाचकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावी म्हणून आवानओल प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या ‘खिंडित गोठलेलं सुख’ या काव्यसंग्रहाची धामणस्कर काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गायकवाड यांच्या कवितेला अनेक मान्यवर समीक्षकांनी प्रतिसाद दिला असून ज्येष्ठ भा. ल. भोळे त्यांच्या कवितेबद्दल म्हणतात, हा कवी त्याच्या सर्वच कवितांमधून जे काही वक्तव्य करतो, त्याचा आशय देशातील संपूर्ण सामाजिक, राजकीय, परिदृश्याला सामावून व्यक्त झालेला दिसतो. अर्थात असे  समग्र जीवनभान गायकवाड यांच्या कवितेत व्यक्त होत असल्यानेच त्यांना धामणस्कर काव्य पुरस्काराने गौरविण्यात येत आहे, असे आवानओल प्रतिष्ठानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.