|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण

प्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण 

‘असर’च्या अहवालात जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर : कारणे शोधण्याचे जि. प. अध्यक्षांचे आदेश

  • पहिल्या क्रमांकावर होता जिल्हा
  • घसरणीची कारणे शोधण्याची मागणी
  • शिक्षण परिषदांचे होणार आयोजन

प्रतिनिधी / ओरोस:

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षणाचा गुणात्मक दर्जा घसरला असून केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या ‘असर’ या संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात तो राज्याच्या पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. गुणवत्ता घसरल्याने शिक्षकांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घसरणीमागील कारणमीमांसा शोधा. शिक्षकांच्या मानसिकतेत बदल करून अव्वल स्थानासाठी पुन्हा कामाला लागा, असे आदेश जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

 जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. च्या बॅ. नाथ पै. समिती सभागृहात शुक्रवारी झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, समिती सदस्य सरोज परब, सुनील म्हापणकर, विष्णूदास कुबल, संजय म्हापसेकर, संपदा देसाई, उन्नती धुरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी, अन्य विभागांचे अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.

कारणे शोधण्याची मागे

सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात अव्वल होता. मात्र ‘असर’च्या अहवालात तो सरासरी चौथ्या क्रमांकावर गेला असल्याची माहिती आंबोकर यांनी दिली. याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. एकदम चौथ्या क्रमांकावर घसरण्यामागची कारणे शोधण्याची मागणी दादा कुबल यांनी केली. काही शिक्षक नेटच्या नावाखाली दिवसभर बाहेर राहतात. तर भेडशी परिसरातील शिक्षक दर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शाळा सुटण्यापूर्वीच बाजारात दिसतात, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता आणि त्यांची वागण्याची पद्धत याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. एक-दोन शिक्षकांच्या चुकीच्या वागण्याचा त्रास सर्वच शिक्षकांना भोगावा लागू नये, हे लक्षात घेऊन पुन्हा अव्वल स्थानासाठी काम करण्याची मागणी करण्यात आली.

शिक्षण परिषदांचे होणार आयोजन

दरम्यान जिल्हाभरातील शिक्षकांसाठी शिक्षण परिषदांचे आयोजन करुन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातील. आकस्मिक भेटी देऊन कारवाई करण्यापेक्षा चुकीचे काम करणाऱया शिक्षकांना लेखी सूचना दिल्या जातील. दोन ते तीनवेळा संधी देऊनही सुधारणा न झाल्यास व गुणवत्तेत वाढ होताना न दिसल्यास कारवाईबाबत विचार केला जाईल, असे आंबोकर यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षी प्रथम क्रमांक परत मिळविला जाईल, असे आश्वासन दिले.

शाळा सोडल्याचा दाखला इंग्रजी, मराठीतून

शिक्षणासाठी अन्यत्र जाणाऱया विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्यातील इंग्रजी भाषेची अडचण टाळण्यासाठी यापुढे मराठी आणि इंग्रजीतून दाखला दिला जाणार आहे. छपाईसाठी अंदाजपत्रकात तरतूद करून घेण्याचे आदेश अध्यक्ष सौ. सावंत यांनी दिले. शिक्षण विभागाच्या सुधारित अंदाजपत्रकाबाबत चर्चा करण्यात आली. बाल कला, क्रीडा, महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, इस्त्राs सहल, स्काऊट गाईड आणि सादीलच्या बजेटमध्ये वाढ सूचविण्यात आली. त्यानुसार वित्त समितीला अंदाजपत्रक सादर करावे, असे आदेश देण्यात आले. डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा 10 फेब्रुवारीऐवजी मार्चच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यासही यावेळी शिक्षण समितीकडून मान्यता देण्यात आली.