संतोष गिलबिले यांचा भाजीविक्रेता ते रंगभूषाकार प्रवास

मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये रंगभूषाकार म्हणून स्वत:चा ठसा उमटवलेले रंगभूषाकार संतोष गिलबिले यांची आता बॉलीवुडमध्ये एन्ट्री होत आहे. बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसफष्टीत प्रवेश केलाय. चित्रपट किंवा रंगभूषेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना संतोष गिलबिले यांनी आपले नाणे खणखणीत वाजवलेय.
रंगभूषा म्हणजे काय? हे माहीत नसण्यापासून हिंदीत रंगभूषाकार म्हणून मानाने काम करण्यापर्यंतची मजल संतोष यांनी मारली आहे. संतोष यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडिलांची भाजीची गाडी होती. त्या गाडीवर भाजी विकण्यासाठी संतोष बसायचे. तशाही परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कला मंडळात प्रवेश घेतला. सुरुवातीला एकांकिकांमधून छोटय़ा-छोटय़ा भूमिका केल्या. पण अल्पावधीतच अभिनय हा आपला प्रांत नाही हे त्यांना कळून चुकले. पण, तोपर्यंत नाटकाने मनात घर केले होते. एकदा नाटक पाहायला गेलेले असताना त्यांनी त्यांच्या मित्राला कलाकारांची रंगभूषा करताना पाहिले आणि तिथे त्यांच्या मनात रंगभूषेचे बीज पेरले गेले. त्यांनी बालनाटय़ांपासून रंगभूषा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक नाटके, मराठी चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषा केली. केवळ रंगभूषाच नाही, तर रंगभूषाकार (मेकअप डिझायनर) म्हणूनही नाव कमावले. अमर फोटो स्टुडिओ सारखी नाटके, किल्ला, एक हजाराची नोट, रिंगण, देऊळ, चि. व. चि. सौ. कां, शाळा, राक्षस, सलाम, यंग्राड, बाबू बँड बाजा अशा अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप डिझायनर म्हणून काम केले आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
मेकअप करणे आणि मेकअप डिझाईन करणे यात फरक आहे. लेखक दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेली व्यक्तिरेखा उभी करणे हे आव्हानात्मक काम आहे. कारण त्यात भौगोलिक स्थिती, शारीरिक ठेवण, काळ या सगळय़ाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमे वेगळी आहेत, हे ओळखून काम करावे लागते. चित्रपटात विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पॅमेरा खोटे बोलत नाही. केलेले काम प्रेक्षकांना अगदी जवळून दिसते, असे संतोष सांगतात. मणिकर्णिका हा अत्यंत आव्हानात्मक चित्रपट होता. पहिला हिंदी चित्रपट म्हणून थोडे दडपणही होते. मात्र, हा चित्रपट करताना खूप मजा आली. त्यात काय केले आहे, हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला मिळेलच… मात्र बालनाटय़ ते हिंदी चित्रपट हा प्रवास खूप काही देणारा ठरला, अशी भावनाही ते आवर्जून व्यक्त करतात.