|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गतवैभवासाठी भंडारी बांधवांनी एकसंघ व्हावे!

गतवैभवासाठी भंडारी बांधवांनी एकसंघ व्हावे! 

नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे आवाहन

प्रत्येकाला काम, निवारा हाच महासंघाचा संकल्प!

किती दिवस पालखीचे भोई होणार?

वेंगुर्ल्यात भंडारी समाज जिल्हास्तरीय महामेळावा

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

गेली 20 वर्षे आपण भंडारी समाज एकसंघ करण्याचे काम करत आहे. ‘भंडारी जोडोअभियानामुळे समाज एकवटतो आहे. भंडारी समाजाला आता आपली ताकद दाखवायची आहे. समाजात पूर्वी एकजूट होती. त्यावेळी समाजाचे बारा ते तेरा आमदार निवडून यायचे. आता ते वैभव परत मिळविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. भंडारी समाजाला आता सर्वच क्षेत्रात आपली एकजुट दाखवावी लागेल. यापुढे कोणत्याच पक्षाच्या पालखीचे भोई आपण होता नये, असे भंडारी समाजातील प्रत्येक व्यक्तीस काम निवारा मिळवून देणे हा महासंघाचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय हा रथ थांबणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले.

जिल्हा भंडारी समाजाचा महामेळावा रविवारी कॅम्प येथील कै. मच्छिंद्र कांबळी, कै. रमाकांत आचरेकर सभामंडपात कै. भागोजीशेठ कीर रंगमंचावर अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी आंध्रप्रदेशचे कामगार मंत्री पी. सत्यनारायण, तेलंगणाचे माजी खासदार पिल्ले लक्ष्मणराव गौड, माजी आमदार शंकर कांबळी, उद्योजक दादासाहेब परुळकर, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरद बोरकर, महिला उपाध्यक्षा रिटा मिठबांवकर, वेंगुर्ले सभापती सुनील मोरजकर, सावंतवाडी सभापती पंकज पेडणेकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजीव कीर, माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये, जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र मसुरकर, देवगड तालुकाध्यक्ष हेमंत करंगुटकर, एकनाथ पिंगुळकर, लीलाधर हडकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष रमण वायंगणकर, अरुण दूधवडकर, गुरुनाथ मिठबावकर, राजीव गवंडे, कृष्णा पालयेकर, पंढरीनाथ आंबेरकर, अरुणा शिरधनकर, शेफाली कोले, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, प्रा. दिलीप गोडकर, गुरुनाथ पेडणेकर, उन्नती धुरी, सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

भंडारी रत्न पुरस्कारांचे वितरण

मेळाव्याचे भंडारी समाज वेबसाईडचे उद्घाटन पी. सत्यनारायण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, भंडारी जोडो अभियान राबविणारे नवीनचंद्र बांदिवडेकर यांनाभंडारी रत्न पुरस्कारप्रदान करण्यात आला. साहित्यिका वृंदा कांबळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांना पुरस्कार, सन्मानपत्राने गौरविण्यात आले. स्वागताध्यक्ष पुष्कराज कोले त्यांच्या पत्नी शेफाली कोले यांचाही सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भंडारी समाजाची अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली.

एकजुटीचा संकल्प करूया!

बांदिवडेकर पुढे म्हणाले, अखिल भारतीय भंडारी महासंघातर्फे चांदा ते बांदा भंडारी जोडो अभियान राबविण्यात आले. हे अभियान आता ते डहाणूपर्यंत राबविण्यात येणार आहे. भंडारी जोडो महारथाचा सारथी मी असलो, तरी तुम्हा सर्वांचे पाठबळ माझ्या पाठिशी आहे. भंडारी समाजातील प्रत्येक व्यक्तीस काम निवारा मिळवून देणे हा महासंघाचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय हा रथ थांबणार नाही, असे बांदिवडेकर म्हणाले.

समाजाच्या एकजुटीसाठी मेळावा!

स्वागताध्यक्ष पुष्कराज कोले यांनी या महामेळाव्यांचे यजमान पद वेंगुर्लेला दिल्याबद्दल अखिल भारतीय भंडारी महासंघाचे आभार व्यक्त केले. भंडारी समाज एकजुटीसाठीच हा मेळावा असल्याचे स्पष्ट केले. तर गोव्याचे अनिल होबळे यांनी गोव्यात भंडारी समाज एकसंघ झाल्यानेच तेथे भंडारी समाजाला साडे एकोणीस टक्क्यांवरून सत्तावीस टक्के आरक्षण मिळाल्याचे सांगितले. एकजुटीमुळेच गोव्यात 40 पैकी सात ते आठ आमदार हे भंडारी समाजाचे असतात, असेही ते म्हणाले. समाजामध्ये राजकारण नको मात्र, राजकारणात भंडारी असलाच पाहिजे, असे शरद बोरकर यांनी सांगितले.

समाजासाठी राजकारणात!

सर्वच राजकीय पक्षांकडून भंडारी समाजाचा केवळ वापर केला जात आहे. त्यामुळे आता भंडारी समाजातीलच उमेदवाराला आपण निवडून दिले पाहिजे, असे मत लक्ष्मणराव गौड यांनी केले, तर मी राजकारणी नाही, पूर्णपणे व्यावसायिक आहे. केवळ समाजासाठी आपण राजकारणात आलो आहे. तुमची एकजूट असेल तर तुमची राजकारणात निश्चितच दखल घेतली जाईल. यासाठी एकसंघतेतून दबावगट निर्माण करा, पी. सत्यनारायण यांनी सांगितले. यावेळी नियोजित भंडारी भवनासाठी महेश सारंग यांनी 15 लाखाची देणगी जाहीर केली.

शहरातून भव्य रॅली

यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, माणिकराव कमलेकर, अतुल बंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष पुष्कराज कोले, सूत्रसंचलन पं. . सदस्या अनुश्री कांबळी, श्वेता चमणकर, तर आभार रमण वायंगणकर यांनी मानले. मेळाव्याच्या प्रारंभी रामेश्वर मंदिर ते पीराचा दर्गा तिथून कॅम्प सभामंडप अशी रॅली काढण्यात आली.