|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मंत्री रावतेंनी घेतला सेना पदाधिकाऱयांचा समाचार

मंत्री रावतेंनी घेतला सेना पदाधिकाऱयांचा समाचार 

प्रतिनिधी/ सातारा

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बुथ कमिटी प्रमुख, विभाग प्रमुख यांची बैठक हॉटेल लेक ह्यूच्या सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित केली होती. या बैठकीला मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहिल्याने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पारा चढला. त्यामुळे तावडीत सापडलेल्या जावलीचे एकनाथ ओंबळे यांचा रावतेंनी चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, जिल्हा प्रमुख बंडा कुंभारदरे हे त्यांच्यासोबत पदाधिकारी आल्याने पेटलेल्या आगीत आणखी तेल पडले अन् पुन्हा भडका उडाला. त्यांनी आयोजित बैठक स्थगित करत असल्याचे जाहीर केले. बुथ प्रमुखांची वैयक्तिक बैठक तुमच्या सवडीने घेतो, अशा शब्दात जिह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना शाब्दिक डोस दिले.

सातारा जिह्यातील बुथ प्रमुखांची आणि विभागप्रमुखांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्याकरता हॉटेल लेक ह्यूव येथे मंत्री दिवाकर रावते यांनी बैठकीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे पदाधिकाऱयांच्याही अगोदर रावते हजर झाले तर हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच कार्यकर्ते दिसले. त्यामुळे मंत्री रावते प्रचंड खवळले. समोर आलेले एकनाथ ओंबळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. बुथ प्रमुख कुठे आहेत, पदे दिली गेली नाहीत, कामे करता की झोपा काढता?, शिवसेना अशाने वाढेल का?, पद घेतले म्हणून नुसते झाले नाही, तसे कामही दाखवावे लागते, अशा शब्दात फैरी झाडत असल्याचे पाहून इतर पदाधिकारीही अंग चोरुन बैठकीला हजेरी लावत होते. आपल्याकडे तर त्यांचा निशाणा वळणार नाही ना, या भितीने काहींनी नावही सांगितले नाही. झापाझापी सुरु असतानाच 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या कार्यकर्त्यासमवेत जिल्हा प्रमुख बंडा कुंभारदरे हे पोहोचले. त्यांच्या येण्यामुळे आणखी आगीत तेल पडले. उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांना बजावत पुढच्यावेळेस बुथ प्रमुखांना वेळ असेल तर बैठक घ्या, समोरासमोर त्यांची बैठक घेतो. पुसेगावचे प्रताप जाधव यांनाही कानटोचणी केली. या प्रकारामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जरा हिरमुसले अगोदरच जिह्यातील सेनेला उतरती कळा लागली आहे. त्यातच अशी बोलणी खावी लागल्याने सेनेत काही उरले नसल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

‘तरुण भारत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा

शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये पालकमंत्री आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याबाबत तीव्र नाराजी असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याबाबतही या बैठकीत जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, या बैठकीने शिवसेनेत चार्जिंग होण्याऐवजी आणखी डिस्चार्ज झाली ती जिल्हा प्रमुखांच्या ढिसाळ नियोजनामुळे, अशीही चर्चा सुरु होती.