|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » ज्योतिरादित्य शिंदेंनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट

ज्योतिरादित्य शिंदेंनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतरही मध्य प्रदेशामध्ये राजकीय घडामोडी सुरूच आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. तसेच या भेटीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेटली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटे बंद दरवाजा आड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे बाहेर येत पत्रकारांची भेट घेतली. ज्योतिरादित्य शिंदे आणि शिवराज सिंह यांची भेट होणार असल्याचे वृत्त आल्यापासून शिवराज सिंह चौहान यांच्या घरासमोर प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती. ही एक सर्वसामान्य भेट असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. सोबतच चर्चाही चांगली झाली, असे ते म्हणाले. त्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मध्य प्रदेशमधील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुका याबाबत चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आपण पारंपरिक गुणा-शिवपुरी येथूनच लढणार आहोत, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे शिवराज सिंह चौहान यांनीही ही औपचारिक भेट असल्याचे म्हटले आहे. आमच्यात चर्चा झाली मात्र त्यात तक्रार किंवार दुर्भावनेचे सूर नव्हता, असेही चौहान यांनी सांगितले. मात्र या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण मात्र तापले आले.