|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

पौष मासाविषयी असलेले गैरसमज

बुध. दि. 23 ते 29 जानेवारी 2018

सर्वसाधारणपणे पौष मासात कुणीही लग्न, मुंज व इतर धार्मिक कामे करीत नाहीत. हा महिना अशुभ मानला जातो. काही समाजात तर या महिन्यात शुभ कार्याची बोलणीसुद्धा करीत नाहीत. वास्तविक या साऱया गैरसमजुती आहेत. हा महिना अत्यंत शुभ महिना आहे. गुरुपुष्यामृत योग हा सर्व श्रे÷ राजयोग मानला जातो. त्या योगावर सुवर्ण खरेदी करतात. त्यामुळे समृद्धी येते अशी समजूत आहे. नक्षत्राचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्राच्या अंमलाखाली हा गुरुपुष्यामृत अमृत योग होतो. त्याच नक्षत्राच्या आधिपत्याखाली पौष महिना येतो. त्यामुळे तो अशुभ नाही. लग्न, मुंज, वास्तुशांती, प्रवास, व्यवसायाचा शुभारंभ यासह कोणतीही शुभ कामे या महिन्यात करता येतात. त्यामुळे अशुभ महिना म्हणून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नयेत. आता हा महिना अशुभ का मानतात, याचे कारणही माहीत असणे, आवश्यक आहे. कुबेर व मदनाच्या अंमलाखाली असलेला हा महिना हा तसा पाहिला असता अत्यंत शुभ आहे. पौष महिना अशुभ म्हणून त्याचा अपमान केल्यास दारिद्रय़ येते. त्यामुळे अशुभ महिना म्हणून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नयेत. पौष महिन्यातच शाकंभरी देवीचे नवरात्र अष्टमीपासून सुरू होते व ते पौर्णिमेपर्यंत रहाते. ज्या महिन्यात शाकंभरी देवीचे नवरात्र असते, तो महिना अशुभ कसा मानता येईल? पुराणात काही संदर्भ दिलेले आहेत पण ते देवदेवतांशी संबंधित आहेत. त्यामुळे जर या महिन्यात शुभ दिवस अथवा मुहूर्त असतील तर कोणतीही शुभ कार्ये करता येतात. बेळगावातील वेदशास्त्रसंपन्न व गणेशाचा प्रासादिक वरदहस्त लाभलेले श्री वासुदेव छत्रे गुरुजीनी या पौष मासाबाबत अत्यंत मोलाची माहिती दिलेली आहे. परमेश्वराने शरीराच्या रुपाने आपल्याला खूप काही दिलेले आहे. त्याचा योग्य वापर कर व तुझे जीवन सोन्यासारखे बनव, इतरांचे सुख श्रीमंती अथवा प्रसिद्धी नावलौकीक किंवा त्याचे सुख पाहून मत्सर करू नको तरच तुला मनशांती मिळेल. शांती, पूजापाठ, जप- तप तसेच देवाधर्माबरोबरच  आपले प्रयत्नही पाहिजेतच तरच परमेश्वरी कृपा राहील व ती कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही, असा संदेश देणारा हा पौष महिना आहे. या महिन्यात लक्ष्मी विष्णू संबंधित कोणतीही पूजा कुबेराची कृपा मिळवून देते. कुबेराचा कोणताही मंत्र या महिन्यात जास्तीत जास्तवेळ जपावा. शिवाला तुपाचा, सूर्याला दुधाचा तसेच कुलदेवाला पंचामृतासह फळांचा अभिषेक, गायीचे पूजन, ताम्रदीपात तिळ तेलाचा दिवा लावून त्याची पूजा केल्यास असंख्य शापीत दोष कमी होऊन सुखसमृद्धी येते. पौष पौर्णिमा व पौष अमावास्या यांचे महत्त्व फार मोठे आहे. अनेक धार्मिक ग्रंथात याचे सविस्तर विवेचन आहे. पौष मासात देवाधर्माची महत्त्वाची कामे करून घ्यावीत. हा महिना कुबेर लक्ष्मीशी संबंधित असल्याने या दोन देवताशी संबंधित पूजाअर्चा, अभिषेक, उदक शांतविधी, श्राद्धकर्मे, अलक्ष्मीनिस्सारण वगैरे कार्ये अवश्य करावीत. संपूर्ण कुटुंबावर त्याचे शुभ परिणाम होतील. या पौष महिन्यात 27 रोजी भानुसप्तमी सूर्याच्या आराधनेस चांगली आहे. चाक्षुषोपनिषद स्तोत्र वाचण्यास सुरुवात करावी, म्हणजे नेत्रविकार कमी होतात. 28 रोजी दुर्गाष्टमी आहे. या दिवशी स्त्रियांचा मानसन्मान करून त्याना लक्ष्मीस्वरुप समजावे. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. व्यवसाय सरळ चालत नसतील, सांसारिक जीवन बिघडलेले असेल, ज्यांच्या हाती पैसा टिकत नसेल, त्यांनी तर पौष मासात लक्ष्मीपूजन अवश्य करावे. विवाहाची बोलणी, वाटाघाटी करावी. सांसारिक कलह असतील तर ते मिटवावेत. पती-पत्नीतील सामंजस्य व प्रेम वाढेल. संसार सुखाचे होतील. मुलाबाळांचे कल्याण होईल. जोतिष व धर्मशास्त्र यांची सांगड घालून ती जनकल्याणार्थ प्रसिद्ध केली आहे.

मेष

व्यावसायिक दृष्टीने चांगला काळ. दूरवरचे प्रवास घडतील. मुलाबाळांचा भाग्योदय होईल. स्पर्धा असलेल्या कोणत्याही क्षेत्रात चांगले यश मिळवाल. जुन्या ओळखीने नोकरी मिळू शकेल. विनाकारण बालंट येण्याची शक्यता. नवे वाहन घेण्याचा विचार कराल.


वृषभ

शुक्राचे भ्रमण अतिशय चांगले राहील. सर्व कामात मोठे यश मिळवून देणारे ग्रहमान. ध्यानीमनी नसताना मोठमोठे लाभ होत राहतील. भागीदारीचे व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. घरात लग्न कार्याची बोलणी अथवा वाटाघाटी सुरू होतील. वाहन जपून चालवा. मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवा.


मिथुन

कर्मस्थान व धनस्थानावरील गुरुच्या शुभ योगामुळे सतत चांगल्या वार्ता ऐकू येतील. घरातील वातावरण आनंदी राहील. लग्नविषयक वाटाघाटींना यश मिळेल. वैवाहिक जोडीदारास वाहन शिकताना अपघात व तत्सम अडचणी उद्भवतील. सरकारी कामे तूर्तास पुढे ढकला. वास्तुत कोणतीही पाडापाडी करू नका. नव्या ठिकाणी प्रवासाचे योग.


कर्क

नोकरी व्यवसायाच्या बाबतीत चांगले योग. वास्तू व वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. या महिन्यात अतिउत्साहाला आळा घाला. तुमच्या राशीला सूर्योपासना अतिशय लाभदायक ठरू शकते. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. स्वतंत्र व्यवसाय असेल तर फार मोठे यश व धनलाभ होण्याचे योग. नोकरी व्यवसायात असाल तर इतरांच्या चुकीमुळे अपमानास्पद प्रसंग उद्भवतील.


सिंह

सरकारी कामे अथवा कोर्टमॅटर जरा स्थगित ठेवा. मनातील अनेक गोष्टी साध्य होतील. वास्तू व वाहन खरेदीची  इच्छा पूर्ण होईल. रवि, मंगळ, शनि योगामुळे सर्व तऱहेची यंत्रे, मशिनरी, वाहन व विद्युत उपकरणे जपून  हाताळा. किरकोळ अपघात होण्याची शक्मयता. या महिन्यात अतिउत्साहाला आळा घाला. तुमच्या राशीला हा महिना म्हणावा तितका चांगला नसतो.


कन्या

हा आठवडा सतत धावपळ व दगदगीचा ठरेल. प्रवास, तीर्थयात्रा, महत्त्वाच्या वाटाघाटी, विवाहाच्या प्रयत्नात असाल तर हमखास यश मिळवाल. स्वतंत्र व्यवसाय असेल तर फार मोठे यश व धनलाभ होण्याचे योग. नोकरी व्यवसायात असाल तर अचानक अपमानास्पद प्रसंग उद्भवतील. नवीन जबाबदारी वाढेल. त्याचवेळी घरातील कुणीतरी अचानक आजारी पडणे, वगैरेमुळे ताण वाढेल.


तुळ

चतुर्थातील रवीमुळे काही परिस्थितीजन्य अडचणी उद्तभवतील. प्रवास, गाठीभेटी, उत्सव, समारंभ यात अडचणी येतील. नोकरीत व्यत्यय येईल. वाहन अपघात, शत्रुत्व, यामुळे मनस्ताप होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी व्यवसायात अडचणी आल्या तरी गुरुकृपेने त्यातून सुटका होईल. आर्थिक बाबतीत चांगले योग


वृश्चिक

सर्व कामात मनाप्रमाणे यश देणारा महिना. सतत चांगल्या घटना घडतील. बिघडलेले संबंध पुन्हा जुळतील. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल. वाहन, अपघात, भांडण तंटे, यापासून दूर रहावे. कुणाच्याही भानगडीत चुकूनही पडू नका. तुमची चूक नसतानाही त्रास होऊ शकेल. काहीजणांना संकटकाली मदत केल्याचे पुण्य गाठी पडेल.


धनु

मंगल कार्यासाठी प्रवास घडतील. अशुभ योगामुळे नोकरी व्यवसायात अडचणी उद्भवतील. पूर्वीची काही प्रकरणे, त्रासदायक ठरण्याची शक्मयता. कुणासाठी कितीही चांगले केलात तरी त्याचे श्रेय मिळेलच असे नाही. दृष्टी दोषापासून जपावे लागेल. या सप्ताहात कुणाशीही वाकडेपणा येणार नाही, यासाठी जपावे. आर्थिक व्यवहारात कडक धोरण ठेवा.


मकर

11 व्या गुरुची आर्थिक फळे मिळू लागतील. प्रवास, देणीघेणी व इतर कार्याच्या दृष्टीने चांगले योग. विद्यार्थ्यांना घवघवीत यश. घराण्यातील काही दोष कमी होऊ लागतील. नोकरीत अचानक उच्चपद मिळण्याचे योग. महत्त्वाची कामे करून घ्यावीत. या आठवडय़ात कुणाची नको ती जबाबदारी घेऊ नका. काही तरी घोटाळा दिसून येईल.


कुंभ

दहावा गुरु सर्व बाबतीत चांगले फळे देईल. भगीरथ प्रयत्न करूनही न झालेली कामे या आठवडय़ात होऊ लागतील. घरात धार्मिक कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. काही जुनी प्रकरणे या आठवडय़ात निकालात निघतील. आर्थिक बाबतीत चांगले योग. धनलाभ, नवी नोकरी व प्रेमविवाहात यश तसेच परदेश गमन अथवा अति दूरच्या प्रवासाचे योग.


मीन

भाग्योदय, भरभराट कौटुंबिक सौख्य, या दृष्टीने सप्ताह चांगला जाईल. सहज म्हणून सुरू केलेल्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक फायदा झालेला दिसून येईल. सुवर्णकाळ, तुमच्या कुंडलीतील ग्रहमान चांगले असेल तर फार मोठे यश व मोठय़ा प्रमाणात धनलाभ घडू शकतील, पण कोणत्याही बाबतीत अतिरेक नको. वाहन तसेच विद्युत  उपकरणे जपून वापरावीत.